नवीन नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील वाघाळा येथील स्मशानभूमीचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागण्या

नवीन नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील वाघाळा येथील स्मशानभूमीचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप नगरसेवक संजय पाटील घोगरे यांच्या पाठपुराव्यामुळे स्मशानभूमीत शेड उभारून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाघाळा गावठाण परिसरात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध असली तरी आजपर्यंत आवश्यक सुविधा नसल्याने नागरिकांना मोकळ्या जागेतच अंत्यसंस्कार करावे लागत होते. परिसरात नागरी वस्ती वाढल्याने या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर नगरसेवक संजय पाटील घोगरे यांनी 7 जुलै रोजी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी मनपाचे शहर अभियंता दिलीप टाकळीकर आणि कनिष्ठ अभियंता ठाणेदार यांनी स्मशानभूमीच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. स्मशानभूमी विकसित करण्यासाठी मनपा अर्थसंकल्पातून तरतूद अथवा जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती शहर अभियंता दिलीप टाकळीकर यांनी दिली. पाहणीवेळी माजी नगरसेवक संजय इंगेवाड, राजू पाटील घोगरे, साहेबराव काळेवाड, बालाजी घोगरे, नारायण घोगरे, सदाशिव घोगरे, चंद्रकांत घोगरे यांच्यासह अनेक नागरिक व युवक उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला स्मशानभूमीचा प्रश्न आता प्रत्यक्ष विकासकामाच्या दिशेने जात असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. प्रशासनाने निधीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामाला सुरुवात करावी, अशी अपेक्षा वाघाळावासीयांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS