मुदखेड : वसमत (जि. हिंगोली) येथील भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी सुधीर करांडे यांचे चिरंजीव अथर्व सुधीर करांडे याने राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत उत
मुदखेड : वसमत (जि. हिंगोली) येथील भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी सुधीर करांडे यांचे चिरंजीव अथर्व सुधीर करांडे याने राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. अथर्व हा नांदेड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिक्षण घेत आहे. गामा अबॅकसच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ छत्रपती संभाजीनगर येथील मराठा मंदिर मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध गटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत अथर्वने आपल्या वेगवान आणि अचूक गणितीय गणना कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला. सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि गणितातील आवडीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत विविध जिल्ह्यांतून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या गणितीय क्षमता, गणनावेग, अचूकता आणि मानसिक गणना कौशल्याची या स्पर्धेत चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये अथर्वने केलेली उल्लेखनीय कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली. नांदेड येथील अबॅकस सेंटरच्या विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध पारितोषिके मिळविली. अथर्वच्या या यशाबद्दल त्याचे पालक, शिक्षक, गामा अबॅकसचे मार्गदर्शक तसेच सेंटरच्या संचालिका संगीता कुलकर्णी यांनी त्याचे अभिनंदन केले. लहान वयात राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या या यशामुळे अथर्वचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या यशाने करांडे कुटुंबीयांसह शाळा आणि नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. भविष्यातही अथर्वने सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर आणखी मोठी यशशिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा त्याला देण्यात येत आहेत.

COMMENTS