बीड: राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी राबवल्या जाणार्या ओळखपत्र वितरण प्रक्रियेल

बीड: राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी राबवल्या जाणार्या ओळखपत्र वितरण प्रक्रियेला गती देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी तातडीने आणि अचूकपणे पूर्ण करावी, असे कडक निर्देश महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, समाज कल्याण सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांच्यासह सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
ओळखपत्रासाठी गावपातळीवर समिती; १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
बैठकीत माहिती देताना आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे म्हणाल्या की, ऊसतोड कामगारांना अधिकृत ओळखपत्र देण्यासाठी गावपातळीवर विशेष समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका यांचा समावेश असेल. ही समिती गावातील सर्व ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून अचूक यादी तयार करेल व ती मंजुरीसाठी सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करेल. संपूर्ण नोंदणी प्रक्रिया युद्धपातळीवर राबवून १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत हे कामकाज पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुणे येथील ‘स्मार्ट सर्विसेस’ कडून आधुनिक पद्धतीने सर्वेक्षण
महाराष्ट्र राज्यासाठी ‘स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे’ या नामांकित संस्थेकडून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने डेटा संकलित केला जाईल, जेणेकरून एकही पात्र ऊसतोड कामगार नोंदणीपासून वंचित राहणार नाही. बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची संख्या मोठी असल्याने, ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे’ च्या योजनांचा लाभ सर्व पात्र कुटुंबांना मिळवून देण्यासाठी हे ओळखपत्र अत्यंत आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकार्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील समिती सदस्यांची तातडीने बैठक घेऊन, क्षेत्रीय स्तरावरील अडचणी दूर करत प्रत्यक्ष कार्यवाहीला त्वरित सुरुवात करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यंत्रणेला दिले आहेत.

COMMENTS