नांदेड: जिल्ह्यातील नरशी येथे छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अनैतिक मानवी व्यापाराविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक

नांदेड: जिल्ह्यातील नरशी येथे छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अनैतिक मानवी व्यापाराविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) शनिवारी धडक कारवाई करत दोन लॉजवर छापा टाकला. या कारवाईत सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज मालकासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात अनैतिक व्यवसाय चालविणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरशी बसस्थानकासमोरील ‘आशीर्वाद लॉज’ आणि ‘आनंद लॉज’ येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचत शासकीय पंचांसमक्ष दोन सामाजिक कार्यकर्त्यांना बोगस ग्राहक म्हणून लॉजमध्ये पाठवले. तेथील व्यवहाराची खात्री होताच पोलिसांनी दोन्ही लॉजवर एकाचवेळी धडक छापा टाकला.
या कारवाईदरम्यान लॉज मालक पांडुरंग शिवराम श्रीरंगिरे याच्यासह राहुल कोलते, विश्वांभर गाडे, बालाजी सूर्यवंशी, खाकीबा सूर्यवंशी, नरसिंग ठाकूर उर्फ परदेशी, प्रवीण वारनलवार, कृष्णा देशपिठवार, व्यंकट नारे आणि विक्की इंदुरकर अशा एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे तपासात समोर आले आहे.
छाप्यादरम्यान नांदेड आणि पश्चिम बंगाल येथील एकूण ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल आणि साहित्य असा एकूण २ लाख ४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS