कर्जत: तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सुरेश सांगळे (वय १९ वर्षे) या विद्यार्थिनीने नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून राहत्या घर

कर्जत: तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सुरेश सांगळे (वय १९ वर्षे) या विद्यार्थिनीने नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता सांगळे या विद्यार्थिनीस नीट परीक्षेत १६६ गुण मिळाले होते. अपेक्षित गुण न मिळाल्याने ती मानसिक तणावात होती. २५ जुलै रोजी तिने घरातच गळफास घेतला. घटनेच्या वेळी तिचे वडील व भाऊ पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते, तर आई घरातील कामांमध्ये व्यस्त होती. अंकिता अभ्यासाच्या स्वतंत्र खोलीत होती. बराच वेळ तिची काहीच हालचाल न दिसल्याने आईने खोलीचा दरवाजा उघडून पाहिला असता हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी पाहणी केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
आत्महत्येपूर्वी अंकिताने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे की, नीट परीक्षेत तिला १६६ गुण मिळाले तर कट ऑफ १७७ होता. अपेक्षित यश न मिळाल्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले, यातूनच आलेल्या नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचे तिने नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी दिली.

COMMENTS