Homeताज्या बातम्या

बीडच्या 1 लाख 77 हजार शेतकर्‍यांच्या पीकविम्यासाठी पुन्हा आंदोलन

माजलगाव : 2025च्या खरीप हंगामातील पीकविम्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

नांदेडमध्ये ‘शब्द शब्द तुझाच आहे’ कवितासंग्रहाचे 7 जून रोजी प्रकाशन
महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची घोषणा, ‘टेक थर्सडे’ उपक्रमाचा प्रारंभ
भाजपच्या महापौरांच्या बैठकीकडे भाजप नगरसेवकांची पाठ; सिडकोत नागरी प्रश्नांवर एकट्या संजय घोगरे पाटलांची आक्रमक बाजू

माजलगाव : 2025च्या खरीप हंगामातील पीकविम्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 17 हजार 500 रुपये पीकविमा नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.

2025च्या खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 77 हजार 351 शेतकर्‍यांनी पीकविमा भरला असून, 90 हजार 418 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविण्यात आला आहे. या शेतकर्‍यांनी एकत्रितपणे 5 कोटी 24 लाख 39 हजार 820 रुपये विमा हप्ता भरला आहे. मात्र, अपेक्षित नुकसानभरपाई अद्याप मिळाली नसल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला आहे.

या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभीषण थावरे यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. पीकविम्याच्या मागणीसाठी यापूर्वी जिल्ह्यात विविध ठिकाणी मोर्चे, आंदोलने, रास्ता रोको तसेच लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप ठोस निर्णय न झाल्याने समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर बीडच्या पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना पीकविम्याच्या मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांच्या या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने नुकसानभरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 1 लाख 77 हजार 351 शेतकर्‍यांनी पीकविमा भरला आहे. आता त्यांच्या हक्काच्या नुकसानभरपाईसाठी सरकारने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी भूमिका शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभीषण थावरे यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS