वाराणसी : काशी परिसरात सोमवारी जम्मू-तवी मार्गावरील एका रेल्वेत प्रवाशाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. स्नानगृहातून बाहेर पडताच

वाराणसी : काशी परिसरात सोमवारी जम्मू-तवी मार्गावरील एका रेल्वेत प्रवाशाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. स्नानगृहातून बाहेर पडताच अज्ञात हल्लेखोरांनी प्रवाशाच्या डोक्यात गोळी झाडली आणि घटनास्थळावरून पसार झाले. अचानक झालेल्या गोळीबारामुळे डब्यातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मृत प्रवासी बिहारमधील गया जिल्ह्यातील रहिवासी असून ते पत्नी व नातेवाईकांसह सीतापूर येथील नैमिषारण्य धाम येथे दर्शनासाठी जात होते. ही घटना पंडित दीनदयाल उपाध्याय स्थानक आणि वाराणसी स्थानकादरम्यान घडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. मृत व्यक्तीची ओळख दिनेश शाह (वय 42) अशी झाली आहे. ते पत्नीसोबत राखीव डब्यात प्रवास करत होते, तर त्यांची बहीण आणि इतर नातेवाईक सामान्य डब्यात होते. मध्यरात्रीनंतर सुमारे दोनच्या सुमारास दिनेश शाह स्नानगृहाकडे गेले असता, परत येताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर जवळून गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच प्रवासी घटनास्थळी धावले. त्यावेळी दिनेश शाह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. यानंतर रेल्वे कर्मचार्यांना तातडीने माहिती देण्यात आली. रेल्वे वाराणसी स्थानकावर पोहोचल्यानंतर मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीजवळील रोख रक्कम आणि पत्नीचे दागिने सुरक्षित आढळले आहेत. त्यामुळे ही घटना केवळ लुटमारीसाठी नसून, अन्य कारणांमुळे घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्लेखोरांनी पत्नीला कोणतीही इजा केली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी एक पथक रेल्वेसोबत पुढे रवाना करण्यात आले असून दुसरे पथक मृताच्या गावी पाठवण्यात आले आहे. प्रवाशांचे जबाब नोंदवून हल्लेखोरांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

COMMENTS