Homeताज्या बातम्या

भाजपच्या महापौरांच्या बैठकीकडे भाजप नगरसेवकांची पाठ; सिडकोत नागरी प्रश्नांवर एकट्या संजय घोगरे पाटलांची आक्रमक बाजू

नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर महापौर कविता मुळे यांनी शहरातील नागरी समस्यांचा थेट क्षेत्रीय

तार गोठ्यावर पडल्याने आठ गायींचा मृत्यू; देवळाली प्रवरा जवळील काळे वस्तीवरील दुर्दैवी घटना
कर्जमाफी लाभार्थी शेतकर्‍यांसाठी संवाद मेळावा; आधार प्रणालीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन
शिक्षकाच्या आक्रोशाकडे पाठ फिरवणारा शिक्षण विभाग? सुनील मोरे यांच्या आत्महत्येने शिक्षण विभागात खळबळ

नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर महापौर कविता मुळे यांनी शहरातील नागरी समस्यांचा थेट क्षेत्रीय पातळीवर आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, भाजपच्या महापौरांनी बोलावलेल्या या बैठकीकडे भाजपच्याच नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने महापौर आणि भाजप नगरसेवकांमध्ये वाढत चाललेले अंतर पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सिडको क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या बैठकीला प्रभाग क्रमांक २० चे प्रतिनिधित्व करणाऱ्या चार नगरसेवकांपैकी केवळ संजय घोगरे पाटील उपस्थित राहिले.

महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सिडको क्षेत्रीय कार्यालयात बैठक झाली. यावेळी महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त निलेश गाढवे, शहर अभियंता सुमंत पाटील, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादेक, उपअभियंता प्रकाश कांबळे, सतीश ढवळे, क्षेत्रीय अधिकारी डॉ. मिर्झा बेग यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक २० मधील पाणीपुरवठा, मलनिस्सारण, स्वच्छता, पथदिवे आणि विद्युत विभागाशी संबंधित प्रश्नांचा यावेळी आढावा घेण्यात आला. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर नगरसेवक संजय घोगरे पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरत नवीन वसाहतींमध्ये जलवाहिन्या टाकण्याची तसेच स्वच्छतेची कामे तातडीने करण्याची मागणी केली. मात्र, याच प्रभागातील महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती निरंजना लांडगे, नगरसेवक वैजनाथ देशमुख, सुवर्णा बसवदे आणि मंगला देशमुख हे बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यामुळे महापौरांनी नागरी प्रश्नांवर घेतलेल्या बैठकीत भाजपच्या नगरसेवकांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मतदारांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी अशा बैठकींना उपस्थित राहणे अपेक्षित असताना चार नगरसेवकांची अनुपस्थिती प्रशासन आणि पक्षांतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.

सिडको-हडको परिसराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मनपाच्या रुग्णालयात मातृसेवा केंद्र सुरू करून प्रसूतीगृह आणि शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संजय घोगरे पाटील यांनी केली. गर्भवती महिलांना सध्या आवश्यक उपचारांसाठी इतर रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान, प्रभाग क्रमांक १९ कौठा-वसरणीतील पाणी, रस्ते, नाल्या, स्वच्छता, खड्डे, पथदिवे आणि घंटागाडीच्या समस्यांकडे नगरसेवक अभिजीत सौदे यांनी लक्ष वेधले. या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले. बैठकीला संजय मोरे, राजू काळे पाटील आणि काकडे यांचीही उपस्थिती होती. महापौर विरुद्ध नगरसेवक असा थेट संघर्ष नसला तरी भाजपच्या महापौरांच्या बैठकीला भाजप नगरसेवकांची लक्षणीय अनुपस्थिती हा पक्षांतर्गत समन्वयाचा प्रश्न ठरण्याची शक्यता आहे. आगामी सर्वसाधारण सभेच्या तोंडावर हा दुरावा किती वाढतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS