आयपीएलच्या विद्यमान सत्राच्या चौथ्या फेरीचे शनिवारी दोन सामने खेळले गेले. दोन्ही सामन्यात धावांचा अक्षरशःखच पडला. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे

आयपीएलच्या विद्यमान सत्राच्या चौथ्या फेरीचे शनिवारी दोन सामने खेळले गेले. दोन्ही सामन्यात धावांचा अक्षरशःखच पडला. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे आपले सुरुवातीच तीन सामने गमावून पराभवाची नको असलेली हॅटट्रीक साधणार्या सीएसकेने आपल्या विजयाचा श्रीगणेशा केला. यामध्ये टी-20 विश्वचषकाचा हिरो संजू सॅमसन चमकला तर श्रेयसच्या पंजाबने आपली अपराजितता कायम राखत सनरायझर्सच्या सुर्याला झाकोळले. प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा सहा गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्सने 20 षटकांत सहा गडी गमावून 219 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पंजाबने 18.5 षटकांत चार गडी गमावून 223 धावा करत सामना जिंकला. या विजयासह पंजाब संघ स्पर्धेत अपराजित राहिला आहे. पंजाबने अशाप्रकारे आयपीएलच्या इतिहासातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग पूर्ण केला आहे. यापूर्वी संघाने 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध 262 धावांचे लक्ष्य पूर्ण केले होते. सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा यापूर्वीचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग 2014 मध्ये 206 धावांचा होता. पंजाबने आयपीएलमध्ये 10व्यांदा 200+ धावांचे लक्ष्य पूर्ण केले आहे, जे कोणत्याही संघापेक्षा सर्वाधिक आहे. या यादीत मुंबई इंडियन्स दुसर्या क्रमांकावर आहे, ज्यांनी आयपीएलमध्ये सहा वेळा 200+ धावांचे लक्ष्य पूर्ण केले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना, प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी पंजाबला दमदार सुरुवात करून दिली. या दोन्ही फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये सनरायझर्सला एकही बळी मिळू दिला नाही. प्रियांशने 16 चेंडूंमध्ये आपले अर्धशतकही पूर्ण केले. तथापि, शिवांग कुमारने प्रियांश आर्यला बाद करून पंजाब किंग्सला पहिला धक्का दिला. प्रियांश शानदार फलंदाजी करत होता, पण पाच चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 20 चेंडूंमध्ये 57 धावा करून तो बाद झाला. प्रियांश आणि प्रभसिमरन यांनी पहिल्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अर्धशतक पूर्ण केल्यावर लगेचच प्रभसिमरन सिंग बाद झाला. प्रभसिमरनने 24 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले, पण पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने प्रभसिमरन 25 चेंडूंमध्ये 51 धावा करून बाद झाला. त्यानंतर शिवांगने कूपर कॉनोलीची विकेट घेतली, जो एका चौकाराच्या मदतीने 12 चेंडूंमध्ये 11 धावा करून बाद झाला. तीन विकेट पडल्यानंतर, कर्णधार श्रेयसने प्रभावी खेळाडू नेहल वाढेराच्या मदतीने डाव सावरला. वाढेरा आणि श्रेयसने चौथ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली, जी हर्ष दुबेने तोडली. वाढेरा एका षटकाराच्या मदतीने 14 चेंडूंमध्ये 14 धावांवर बाद झाला. तथापि, श्रेयसने चिकाटी दाखवली आणि वेग वाढवून आक्रमक फलंदाजी केली. श्रेयसने पाच चौकार आणि पाच षटकारांसह 33 चेंडूंमध्ये नाबाद 69 धावा केल्या. सन 2024 पासून धावांचा पाठलाग करताना श्रेयसची बॅट जोरात आहे. त्याने 13 डावांमध्ये 138.75 च्या सरासरीने आणि 171.82 च्या स्ट्राइक रेटने 555 धावा केल्या आहेत, ज्यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. सनरायझर्स हैदराबादकडून शिवांग कुमारने तीन विकेट घेतल्या, तर हर्ष दुबेने एक विकेट घेतली. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, अभिषेक आणि हेडने सनरायझर्सला एक भक्कम सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्याच षटकापासून पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. हेडपेक्षा अभिषेक अधिक आक्रमक होता. अभिषेकने 18 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर हेडने आक्रमक पवित्रा घेतला आणि झेवियर बार्टलेटला लक्ष्य केले. सनरायझर्स हैदराबादने पॉवरप्लेमध्ये एकही गडी न गमावता 105 धावा केल्या, जी आयपीएलमधील तिसरी सर्वोच्च पॉवरप्ले धावसंख्या ठरली. पॉवरप्ले संपल्यानंतर, श्रेयस अय्यरने चेंडू शशांक सिंगकडे सोपवला. शशांक सिंगने एकाच षटकात अभिषेक आणि हेड या दोघांनाही बाद करून सनरायझर्सचा धावगतीचा वेग नियंत्रणात आणला. शशांकने प्रथम हेडला बाद केले, ज्याने 23 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकारासह 38 धावा केल्या होत्या. हेड आणि अभिषेकने पहिल्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अभिषेक शशांक सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. अभिषेक 28 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि आठ षटकारांसह 74 धावांवर बाद झाला. पंजाबने जोरदार पुनरागमन केले. हेड आणि अभिषेक बाद झाल्यानंतर सनरायझर्सचा धावगतीचा वेग मंदावला. पंजाबच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. एका क्षणी असे वाटत होते की सनरायझर्स सुमारे 300 धावा करेल, पण सलामीची जोडी बाद झाल्यानंतर त्यांच्या फलंदाजीचा वेग मंदावला. हेनरिक क्लासेनने काही प्रमाणात संघाला सावरले, पण तो आक्रमक फलंदाजी करू शकला नाही. सनरायझर्सकडून हेनरिक क्लासेनने 39 धावा, तर इशान किशनने 27 धावा केल्या. अनिकेत वर्माने 18 धावा आणि सलील अरोराने नऊ धावांचे योगदान दिले. पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर झेवियर बार्टलेटने एक बळी घेतला.
चेन्नई सुपर किंग्सने (सीएसकेने) दिल्ली कॅपिटल्सला 23 धावांनी पराभूत करून आयपीएलच्या चालू हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला. यापूर्वी, त्यांना आरसीबी, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सकडून मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागले होते. दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव होता. शनिवारी चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, संजू सॅमसनच्या नाबाद शतकाच्या जोरावर सीएसकेने 20 षटकांत दोन गडी गमावून 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्ली कॅपिटल्सचा संघ निर्धारित षटकांत केवळ 189 धावाच करू शकला. यामध्ये केवळ ट्रिस्टन स्टब्सने 60 धावांची सर्वोच्च खेळी केली. सलग सहा आयपीएल पराभवांनंतर चेपॉकमधील चेन्नईचा हा पहिला विजय आहे. या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळलेल्या नऊ आयपीएल सामन्यांमधील चेन्नई सुपर किंग्सचा हा आठवा विजय आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये दिल्लीचा संघ 31व्यांदा सर्वबाद झाला आहे. या विजयामुळे चेन्नईने गुणतालिकेत एका स्थानाची झेप घेत नववे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, दिल्ली चौथ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरुवात केली. केएल राहुल आणि पथुम निस्संका यांनी 4.6 षटकांत पहिल्या विकेटसाठी 61 धावा जोडल्या. राहुल 10 चेंडूंत 18 धावा करून बाद झाला. निस्संकाने 24 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह 41 धावा केल्या. मात्र, समीर रिझवी फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही आणि सहा धावांवर बाद झाला. कर्णधार अक्षर पटेल गुर्जपनीत सिंगच्या गोलंदाजीवर केवळ एका धावेवर बाद झाला. मिलर 14 चेंडूंत केवळ 17 धावाच करू शकला. आशुतोष शर्मा 10 चेंडूंत 19 धावा केल्यानंतर नूर अहमदच्या गोलंदाजीवर अंशुल कंबोजकरवी झेलबाद झाला. ट्रिस्टन स्टब्सने शानदार फलंदाजी करत 38 चेंडूंमध्ये 60 धावांची भक्कम खेळी केली, पण त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. आकिब चार धावांवर बाद झाला. अंशुल कंबोजने कुलदीप यादवला चार धावांवर बाद केले. चेन्नई सुपर किंग्ससाठी जेमी ओव्हरटनने शानदार गोलंदाजी करत आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 18 धावा देऊन चार बळी घेतले. अंशुल कंबोजने तीन बळी घेतले. यापूर्वी, सीएसकेने 20 षटकांत दोन बाद 212 धावा केल्या होत्या. संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांची सलामीची जोडी या हंगामात पहिल्यांदाच चांगल्या लयीत दिसली. त्यांनी 6.2 षटकांत पहिल्या विकेटसाठी 62 धावा जोडल्या. ऋतुराज 18 चेंडूंचा सामना करून 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर सॅमसनला आयुष म्हात्रेच्या रूपात एक चांगला साथीदार मिळाला. या दोघांनी 68 चेंडूंमध्ये दुसर्या विकेटसाठी 113 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. आयुषने 36 चेंडूंमध्ये 59 धावा करून निवृत्ती घेतली. दरम्यान, संजू सॅमसनने 52 चेंडूंमध्ये आपले चौथे आयपीएल शतक ठोकले. सॅमसनने 15 चौकार आणि 4 षटकारांसह 56 चेंडूंमध्ये 115 धावांची अविस्मरणीय नाबाद खेळी केली. शिवम दुबेनेही 10 चेंडूंमध्ये नाबाद 20 धावा केल्या. डीसीकडून गोलंदाजीत अक्षर पटेलने एकमेव बळी मिळविला. दिल्लीचे सलग दोन पराभव व सीएसकेचे विजयी पुनरागमन स्पर्धेचे गणित बदलवत आहे आणि ते क्रिकेटची लोकप्रियता टिकविण्यात महत्वाची भूमिका बजावणार यात तिळमात्रही शंका नाही.
डॉ.दत्ता विघावे
मो : 9096372082

COMMENTS