शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. ते खरेही आहे. कारण आजघडीला आ

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. ते खरेही आहे. कारण आजघडीला आपल्याला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणानेच आपला सर्वांगीण विकास होणार आहे. आपल्या बुद्धीला चालना मिळणार आहे आणि आपल्या बुद्धीच्या कक्षा रुंदावत जाणार आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला जगाला घडवण्याची प्रेरणा मिळणार आहे. म्हणून प्रत्येकाने शिक्षण हे घेतलेच पाहिजे. कारण माणसाला जगण्यासाठी ज्याप्रमाणे अन्न व पाण्याची गरज असते. त्याप्रमाणेच जीवन जगण्यासाठी बुद्धीला ज्ञानाची गरज असते. ती गरज भागवण्याचे काम आपल्याला शिक्षण करणार आहे. आपल्याला मानवी जीवन मिळणे ही निसर्गाची देण आहे. पण त्या जीवनाला आकार देण्याचे काम शिक्षण करणार आहे. म्हणून प्रत्येकाने शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. शिक्षणाशिवाय माणसाचा व्यवहार हा रानटी पशुप्रमाणे होय. शून्यातून विश्व उभारण्याची ताकद फक्त आपल्याला शिक्षणातूनच मिळू शकते. शिक्षणच माणसाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते. म्हणून आजच्या युवकांनी इकडे तिकडे भरकटत जाण्यापेक्षा शिक्षणाची कास धरायला हवी. एकदा का आपली बुद्धी प्रगल्भ झाली की, मग आपण कोणत्याही क्षेत्रात झपाट्याने प्रगती करू शकतो. परंतु शिक्षण हे केवळ नोकरीसाठीच शिकायचे का? तर नाही, कारण जर डॉ. बाबासाहेबांनी शिक्षण हे केवळ नोकरीसाठीच घेतले असते, तर ते भारतीय संविधानाचे शिल्पकार व आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते झाले असते का? नाहीतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर नोकरीच करत बसले असते तर, हे सगळं शक्य होतं का? डॉ.बाबासाहेब आंबेडकर इतके ज्ञानाचे भुकेले होते की, त्यांनी आयुष्यभर आपल्या बुद्धीला ज्ञानाचा खूराक देण्याचे काम केले. जीवनभर विद्यार्थी म्हणून ज्ञान घेण्याचे व ज्ञान देण्याचे पवित्र असे काम केले. म्हणूनच त्यांना संपूर्ण जग आदराने ज्ञानाचे प्रतीक असं म्हणते. या जगात जेवढे महापुरुष होऊन गेले त्या महापुरुषांनी केवळ नोकरीसाठीच शिक्षण घ्यायचे, असे म्हटले होते का? आणि ते जर केवळ नोकरीच करत बसले असते तर जगाचे कोहिनूर झाले असते का? कारण आज जर बघितले तर आपल्याला असे दिसून येईल की, काही सुशिक्षित युवक, नोकरदारांना मागे पाडून जगात नंबर एकचे उद्योगपती म्हणून मिरवत आहेत. म्हणून प्रत्येकाने शिक्षण घेऊन जागतिक क्षेत्रात दिमाखाने वावरले पाहिजे. पण खेदाची बाब म्हणजे ग्रामीण भागात आजही बहुतांश तरुण तरुणी नोकरी लागत नाही म्हणून शिक्षण अर्ध्यावर सोडून बसले आहेत. त्यांना शिक्षणाचा खूप कंटाळा आला आहे. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे काही मुलांचे आईवडील आपल्या मुलांना कुठे नोकरी लागते का? म्हणून शिक्षण सोडून द्यायला सांगतात. तर असे बोलणे साफ चुकीचे आहे. कारण शिक्षणानेच मनुष्याचा उध्दार होतो, हे अगोदर त्यांना कळायला हवे. म्हणून समस्त पालकांना विनंती आहे की, आपण शिक्षणाचे महत्त्व वेळीच ओळखून आपल्या मुलांना शाळेत पाठवा आणि त्यांना उच्च शिक्षणाचे धडे गिरवू द्या. कारण यापुढे शिकणारेच वाचतील बाकीचे अलगद फसतील!
बुद्धभूषण कांबळे
मो : 7498715661

COMMENTS