नांदेड : मागील काही महिन्यांपासून सांगवी प्रभागासह नांदेड शहरातील अनेक भागांत वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाचा त्रास, जळणारे रोहित्र आण

नांदेड : मागील काही महिन्यांपासून सांगवी प्रभागासह नांदेड शहरातील अनेक भागांत वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाचा त्रास, जळणारे रोहित्र आणि वाढता भार यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अखेर या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महावितरण प्रशासनाने व्यापक उपाययोजना हाती घेण्याचा निर्णय घेतला असून सांगवी प्रभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नांदेड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेच्या नगरसेविका मीनल गजानन पाटील यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन सांगवी परिसरातील वीज समस्यांबाबत सविस्तर निवेदन दिले. त्यानंतर झालेल्या बैठकीत विविध कामांचे नियोजन निश्चित करण्यात आले. बैठकीत पुढील एका महिन्यात सांगवी प्रभागातील सहा ठिकाणी नवीन विद्युत रोहित्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. सिद्धार्थ नगर, बाबा कॉलनी, मालटेकडी, विठ्ठल नगर यांसारख्या दीर्घकाळ दुर्लक्षित भागांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे सध्याचा अतिरिक्त भार कमी होऊन वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. याशिवाय पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक अशा 100 ठिकाणी नवीन वीज खांब उभारण्यात येणार आहेत. विठ्ठल नगर येथे थ्री-फेज लाईन उभारणे, जय भवानी नगर ते सांगवी दरम्यान नवीन रोहित्र बसविणे, तसेच सांगवी परिसरातील शेतकर्यांना दिवसा वीजपुरवठा मिळावा यासाठी फिडरमध्ये बदल करण्याचाही निर्णय झाला आहे. वीजचोरी रोखण्यासाठीही प्रशासनाने ठोस पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. नागरिकांना कमी दरात आणि एका दिवसात अधिकृत वीजजोडणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला. नगरसेविका मीनल गजानन पाटील यांनी सांगितले की, पुढील एका वर्षात टप्प्याटप्प्याने 560 वीजखांब आणि 16 नवीन रोहित्र उभारण्याबाबत कार्यकारी अभियंत्यांनी सकारात्मक शब्द दिला आहे. तसेच सांगवी प्रभागाला पुरवठा करणार्या 33 केव्ही वाहिनीत तातडीने बदल करण्यात येणार आहे. तात्पुरत्या डागडुजीऐवजी पुढील वीस वर्षांचा विचार करून कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात, यासाठी मी स्वतः सातत्याने पाठपुरावा करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे सांगवी प्रभागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून लवकरच विजेचा लपंडाव संपण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

COMMENTS