माहूर : शेकापूर (ता. माहूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या वादातून ग्रामपंचायत अधिकारी नामदेव सुभाष देवकते यांच्याविरुद्ध तसेच तक्रारदार स
माहूर : शेकापूर (ता. माहूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या वादातून ग्रामपंचायत अधिकारी नामदेव सुभाष देवकते यांच्याविरुद्ध तसेच तक्रारदार समाधान अशोकराव कांबळे यांच्याविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रकरणाने स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे.
तक्रारदार समाधान कांबळे (रा. शेकापूर) हे विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी दि. 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. यावेळी ग्रामसेवक नामदेव देवकते यांनी त्यांच्याशी उद्धटपणे वागत जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच पूर्वी दिलेल्या तक्रारी मागे घेण्याचा दबाव टाकत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. कांबळे यांनी यापूर्वीही ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी न केल्याबाबत 15 एप्रिल 2025 व 15 एप्रिल 2026 रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती माहूर यांच्याकडे तक्रारी दिल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणी कांबळे यांच्या तक्रारीवरून नामदेव देवकते यांच्याविरुद्ध दि. 23 एप्रिल 2026 रोजी भारतीय न्याय संहिता कलम 352, 351(1), 352(2) तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार भोंडवे करीत आहेत. दरम्यान, या घटनेबाबत ग्रामसेवक नामदेव देवकते यांनीही प्रत्युत्तरात फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते कार्यालयात कामकाज करत असताना समाधान कांबळे यांनी रजिस्टर व कागदपत्रे फेकून देत शिवीगाळ केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या तक्रारीवरून कांबळे यांच्याविरुद्धही बीएनएस 2023 अंतर्गत कलम 132, 352, 351(1), 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परस्पर गुन्ह्यांमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले असून पोलिसांकडून दोन्ही बाजूंच्या तक्रारींचा सखोल तपास सुरू आहे.

COMMENTS