Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धगधगत्या उन्हात वनराज तहानलेले; किनवटच्या जंगलातील पशु-पक्षी पाण्यासाठी ’वणवण’!

किनवट : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, याचा सर्वाधिक फटका किनवटच्या समृद्ध वनसंपदेतील वन्यजीवांना बसू लागला

लातूरमध्ये उष्माघाताने 9 महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूचा संशय
राज्यात उष्णतेची तीव्र लाट ;विदर्भ-मराठवाड्यात तापमानाचा उच्चांक; परभणीत उष्माघाताने एकाचा मृत्यू
सूर्याच्या अग्निप्रकोपापासून सावध राहा; सतर्कता हाच जीव वाचविण्याचा मार्ग-डॉ. वैद्य

किनवट : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, याचा सर्वाधिक फटका किनवटच्या समृद्ध वनसंपदेतील वन्यजीवांना बसू लागला आहे. नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्याने बिबट्यापासून काळविटांपर्यंत सार्‍यांचीच पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू असून, वनविभागाच्या ’कागदी’ नियोजनावर आता वन्यप्रेमींनी कडक ताशेरे ओढले आहेत.
तालुक्यातील जंगल क्षेत्रात असलेले ओढे, नाले आणि झरे कोरडे पडले आहेत. जे काही मोजके नैसर्गिक पाणवठे उरले आहेत, त्यांत मोठ्या प्रमाणात गाळ आणि कुजलेला पालापाचोळा साचला आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने वन्यप्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तातडीने या पाणवठ्यांची स्वच्छता न केल्यास वन्यजीवांना दूषित पाण्यामुळे जीव गमवावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. जंगलात पाणी मिळेनासे झाल्याने वन्यप्राणी आता आपला मोर्चा गावकुसाकडे वळवत आहेत. यामुळे दोन मोठे धोके निर्माण झाले आहेत. पाण्यासाठी प्राणी शेतात किंवा वस्तीत शिरल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाणी शोधण्याच्या नादात महामार्गावर येणार्‍या हरिण, काळविटांना सुसाट वाहनांचा बळी पडावे लागत आहे. पर्यावरणवाद्यांनी वनविभागाकडे काही ठोस मागण्या मांडल्या आहेत, जेणेकरून या मुक्या प्राण्यांचा जीव वाचवता येईल. नैसर्गिक स्त्रोतांमधील गाळ काढून ते तातडीने स्वच्छ करावेत, दुर्गम भागात असलेल्या कृत्रिम हौदांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, जिथे शक्य आहे तिथे सौर ऊर्जेवर चालणारे बोअरवेल बसवून कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा.वनविभागाने केवळ एसी केबिनमध्ये बसून नियोजन न करता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याची गरज आहे. जर वेळीच पाणी उपलब्ध झाले नाही, तर आपण आपली वनसंपदा गमावून बसू. आता प्रशासन या आर्त हाकेला प्रतिसाद देऊन वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी नेमकी काय पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS