Homeताज्या बातम्या

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य अतुलनीय – राजेंद्र मस्के

बीड: शिक्षण क्षेत्रात भरीव आणि वैभवशाली योगदान देतानाच सार्वजनिक जीवनातही आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्

आमदार रोहित पवारांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू; प्रकृती खालावली, शासनाला दिला ‘अल्टिमेटम’
सोन्या-चांदींच्या दरात मोठी घसरण
चिखलीकरांच्या वाढदिवसाने भाजपात नवी राजकीय चर्चा; ’जुन्या निष्ठावंतांची’ पुन्हा एकत्र येण्याची चाहूल?

बीड: शिक्षण क्षेत्रात भरीव आणि वैभवशाली योगदान देतानाच सार्वजनिक जीवनातही आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशाच्या शिक्षण आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. डी. वाय. पाटील यांनी तत्कालीन परिस्थितीत ग्रामीण भागातील गोरगरीब, वंचित आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन, पॉलिटेक्निक तसेच विविध व्यावसायिक शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक जबाबदारीही समर्थपणे सांभाळली. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबरोबरच सार्वजनिक जीवनातील त्यांचे कार्य, दूरदृष्टी आणि सेवाभाव यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. डॉ. डी. वाय. पाटील यांनी उभारलेल्या शिक्षणसंस्था आणि त्यांच्या माध्यमातून घडलेली विद्यार्थी पिढी हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करून त्यांनी समाजाच्या विकासाला मोठे योगदान दिले. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील आणि सार्वजनिक जीवनातील कार्य निश्चितच अतुलनीय आहे, असे राजेंद्र मस्के यांनी आपल्या श्रद्धांजली संदेशात म्हटले. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील एक प्रेरणादायी पर्व संपले असून, त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना सदैव मार्गदर्शक ठरेल, असेही मस्के यांनी नमूद केले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पवित्र स्मृतीस बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

COMMENTS