नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य (बापू) द

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य (बापू) देशमुख आणि भाजप नेते संजय कोडगे यांनी उपस्थिती लावल्याने नांदेडच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. ही उपस्थिती केवळ वैयक्तिक सदिच्छा होती की त्यामागे बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी दडलेली आहे, याबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत.
राजकीय निरीक्षकांच्या मते, भाजपमधील काही जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा चिखलीकर यांच्याशी राजकीय संवाद वाढविण्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेल्या काही पदाधिकार्यांचा पूर्वी चिखलीकर यांच्या नेतृत्वाशी जवळचा संबंध होता, अशी चर्चाही सामाजिक माध्यमांवर रंगत आहे. दरम्यान, खासदार अशोकराव चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर जिल्हा आणि महानगर संघटनेत त्यांचा प्रभाव वाढल्याची भावना पक्षातील काही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे पक्षात जुने-नवे आणि निष्ठावंत-नवनिष्ठ असे दोन प्रवाह निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पूर्वी पक्षातील संघटनात्मक पदावरून झालेल्या मतभेदांची पार्श्वभूमी आणि त्यानंतर झालेले बदल लक्षात घेता, प्रदेश पातळीवरील काही नेत्यांनी चिखलीकर यांच्या कार्यक्रमाला दिलेली उपस्थिती ही केवळ शिष्टाचाराची भेट नसून अंतर्गत राजकीय संदेश असल्याचा दावा काही राजकीय जाणकारांकडून केला जात आहे. मात्र, या संदर्भात भाजप किंवा संबंधित नेत्यांकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. एकंदरित, चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेली ही उपस्थिती नांदेडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगवत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

COMMENTS