नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्यातील विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारीला नव्या उंचीवर नेणार्या अनेक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारांवर गुरुवारी स्

नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्यातील विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारीला नव्या उंचीवर नेणार्या अनेक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारांवर गुरुवारी स्वाक्षर्या करण्यात आल्या. वार्षिक शिखर परिषदेनंतर कृत्रिम बुद्धिमत्ता, औषधनिर्मिती, संरक्षण, सागरी सहकार्य आणि तंत्रज्ञान विकासाशी संबंधित विविध उपक्रमांवर दोन्ही देशांनी सहमती दर्शविली.
यानंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांच्या भारतातील पहिल्या अधिकृत दौर्याचे स्वागत करताना त्यांचा उल्लेख आपली लहान बहीण असा केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि जपानमधील मैत्री ही केवळ राजनैतिक संबंधांपुरती मर्यादित नसून सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि मानवी मूल्यांवर आधारलेली आहे. नारा प्रदेशाचा उल्लेख करत त्यांनी भारत आणि जपान यांना जोडणार्या बौद्ध परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की, दोन्ही देश आज जगातील प्रभावी अर्थव्यवस्थांमध्ये गणले जात असून मुक्त, समृद्ध आणि नियमाधारित हिंद-प्रशांत प्रदेशाची उभारणी ही त्यांची समान प्राथमिकता आहे. लोकशाही मूल्ये आणि मुक्त व्यापार व्यवस्थेच्या बळकटीसाठी भारत आणि जपान एकत्रितपणे काम करत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या शिखर परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधनाला चालना देणे, औषधनिर्मिती क्षेत्रातील तांत्रिक देवाणघेवाण वाढविणे, नव्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे यांसारख्या मुद्द्यांवरही सहमती झाली. भविष्यातील तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी संयुक्त कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी संरक्षण आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, जपानच्या सागरी स्वसंरक्षण दलातील युद्धनौका आणि भारतीय नौदलाच्या युद्धनौकांदरम्यान संयुक्त सराव आयोजित करण्याची योजना आखण्यात आली आहे. हिंदी महासागर परिसरातील संयुक्त उपक्रमांना अधिक गती देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय नौदलाच्या देखभाल, दुरुस्ती आणि पुनर्बांधणी क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देणार्या भारताच्या उपक्रमांतर्गत संरक्षण साहित्य निर्मितीमध्ये जपानी सहभाग वाढविण्याचाही निर्धार दोन्ही देशांनी व्यक्त केला.

COMMENTS