पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून आले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष हा केवळ दोन राष्ट्रांमधील वाद राहिलेला नाही, तर संपूर
पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून आले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष हा केवळ दोन राष्ट्रांमधील वाद राहिलेला नाही, तर संपूर्ण जगाच्या शांततेसमोर उभे राहिलेले गंभीर संकट बनले आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर अमेरिकेने इराणमधील लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यांना इराणनेही प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे. परिणामी संपूर्ण आखाती प्रदेश युद्धजन्य वातावरणात ढकलला गेला आहे. प्रश्न असा आहे की, या संघर्षाचा खरा लाभ कोणाला आणि त्याची किंमत कोण मोजणार?
अमेरिका स्वतःला जगाचा पोलीस समजते. लोकशाही, मानवाधिकार आणि जागतिक सुरक्षिततेच्या नावाखाली तिने अनेक देशांमध्ये हस्तक्षेप केला. अफगाणिस्तान, इराक, लिबिया आणि सीरियातील घटनांनी हे अनेकदा सिद्ध केले आहे की अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे शांतता निर्माण होण्यापेक्षा अस्थिरता अधिक वाढली. आता इराणच्या बाबतीतही तेच चित्र दिसत आहे. एका हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच हवाई हल्ल्यांचा मार्ग स्वीकारणे ही महासत्तेला शोभणारी भूमिका नव्हे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत ‘प्रत्युत्तर आवश्यक होते’ असे म्हटले आहे. पण प्रत्येक वेळी शक्तीचा वापर हाच उपाय असतो का? आंतरराष्ट्रीय कायदे, संयुक्त राष्ट्रसंघ आणि राजनैतिक मार्ग यांचे महत्त्व मग उरते कुठे? जगाला लोकशाहीचे धडे देणार्या अमेरिकेने स्वतःच संयम गमावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे इराणही निर्दोष नाही. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डच्या माध्यमातून इराणने अमेरिकेच्या तळांवर आणि नौदलाच्या सुविधांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे. मानवरहित विमान पाडल्याचेही ते सांगत आहे. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची भाषा ते सातत्याने वापरत आहेत. त्यामुळे संघर्ष शमण्याऐवजी अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यपूर्वेतील अनेक कट्टर संघटनांशी असलेल्या संबंधांमुळे इराणची भूमिका अधिक चिंताजनक ठरते.
या संघर्षात सर्वात मोठे नुकसान सामान्य नागरिकांचे होणार आहे. युद्ध सुरू झाल्यास लाखो लोक विस्थापित होतील, अर्थव्यवस्था कोलमडेल आणि मानवतेचा पराभव होईल. इराक, सीरिया आणि येमेनची उदाहरणे जगासमोर आहेत. युद्धे राजकारण्यांच्या भाषणांत जिंकली जातात; पण त्याची किंमत सैनिकांच्या रक्ताने आणि नागरिकांच्या अश्रूंनी चुकवावी लागते. याहूनही गंभीर बाब म्हणजे या संघर्षाचे जागतिक परिणाम. होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील तेलवाहतुकीची जीवनवाहिनी मानली जाते. जगातील मोठ्या प्रमाणातील कच्चे तेल या मार्गाने जाते. या भागातील अस्थिरतेमुळे तेलाच्या किमती वाढू लागल्या आहेत. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा परिणाम भारतासारख्या विकसनशील देशांवर सर्वाधिक होतो. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस आणि वाहतूक खर्च वाढल्यास महागाईचा भडका उडतो. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष हा केवळ त्यांचा प्रश्न राहात नाही; तो जगातील प्रत्येक नागरिकाच्या खिशाशी जोडला जातो.
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामागे केवळ सुरक्षा किंवा स्वाभिमानाचा मुद्दा नाही. या प्रदेशातील तेलसंपत्ती, सामरिक वर्चस्व आणि भू-राजकीय हितसंबंध यांची मोठी खेळी त्यामागे आहे. महासत्तांच्या अहंकाराचा हा संघर्ष आहे. एका बाजूला जागतिक वर्चस्व टिकवण्याची धडपड आहे, तर दुसर्या बाजूला प्रादेशिक प्रभाव वाढवण्याची महत्त्वाकांक्षा. या दोघांच्या स्पर्धेत शांततेचा बळी दिला जात आहे. विशेष म्हणजे जगातील अनेक राष्ट्रे या संघर्षाकडे चिंतेने पाहत आहेत. इस्रायल, बहारीन, जॉर्डन, लेबनॉन आणि आखाती देश थेट या संघर्षाच्या छायेत आले आहेत. एखादी चुकीची कारवाई किंवा चुकीचा अंदाज संपूर्ण प्रदेशाला युद्धाच्या खाईत लोटू शकतो. अशा परिस्थितीत राजनैतिक संवादाची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे. पण दुर्दैवाने दोन्ही बाजूंकडून सध्या संवादापेक्षा धमक्यांची भाषा अधिक ऐकू येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिकाही येथे प्रश्नचिन्हाखाली येते. जागतिक शांततेसाठी स्थापन झालेली ही संस्था अनेकदा महासत्तांच्या राजकारणात अडकलेली दिसते. संघर्ष रोखण्यासाठी प्रभावी मध्यस्थी करण्याऐवजी केवळ निवेदने देण्यात वेळ जातो. परिणामी युद्धखोर शक्तींना अधिक बळ मिळते. जगाला आज अशा नेतृत्वाची गरज आहे जे संघर्ष वाढवण्याऐवजी संवादाचा मार्ग दाखवेल. भारतासाठीही ही परिस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. भारताचे आखाती देशांशी घनिष्ठ आर्थिक आणि ऊर्जा संबंध आहेत. लाखो भारतीय या प्रदेशात कार्यरत आहेत. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल. तसेच वाढत्या तेलदरांचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसू शकतो. त्यामुळे भारताने संतुलित आणि संयमी भूमिका घेत शांततेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आज गरज आहे ती शक्तिप्रदर्शनाची नव्हे, तर संयमाची. बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे कधीही दीर्घकालीन शांतता निर्माण करू शकत नाहीत. युद्धाचा मार्ग नेहमी विनाशाकडेच नेतो. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी हे वास्तव ओळखण्याची वेळ आली आहे. अन्यथा एका हेलिकॉप्टर दुर्घटनेपासून सुरू झालेला हा संघर्ष उद्या जागतिक आर्थिक संकटात आणि परवा मोठ्या युद्धात परिवर्तित होऊ शकतो. जग आधीच अनेक संकटांशी झुंज देत आहे. अशा वेळी महासत्तांच्या अहंकाराने मानवतेला पुन्हा युद्धाच्या ज्वाळांमध्ये ढकलणे हा इतिहासातील सर्वात मोठा मूर्खपणा ठरेल. अमेरिका आणि इराण यांनी युद्धाचा नव्हे, तर संवादाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. अन्यथा या संघर्षाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यात विजेत्यांची नावे नसतील; असेल तो केवळ मानवतेचा पराभव आणि अहंकाराचा काळाकुट्ट विजय.


COMMENTS