नांदेड : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वार्यामुळे अनेक भागांना मोठा फटका बसला असून अर्धापूर तालुक्यातील नांदला-दिग्रस
नांदेड : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वार्यामुळे अनेक भागांना मोठा फटका बसला असून अर्धापूर तालुक्यातील नांदला-दिग्रस परिसरात केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वार्याचा प्रचंड वेग आणि मुसळधार पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली असून शेतकर्यांच्या हाती आलेला घास हिरावला गेला आहे.
दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वार्यासह पावसाने हजेरी लावली. अर्धापूर तालुक्यातील नांदला, दिग्रस आणि परिसरातील गावांमध्ये वादळी वार्यामुळे केळीची झाडे मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त झाली. उन्हाळी हंगामात मोठा खर्च करून उभ्या केलेल्या बागा काही मिनिटांतच उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याशिवाय ऊस, आंबा तसेच इतर उन्हाळी पिकांनाही फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनीतील माती वाहून गेली असून फळबागांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक चित्र समोर आले आहे. काही गावांमध्ये घरांवरील टिनपत्रे उडून गेल्याने नागरिकांचेही नुकसान झाले आहे. वीजपुरवठ्यावरही काही काळ परिणाम झाल्याची माहिती मिळाली आहे. नुकसानग्रस्त भागातील शेतकर्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी केली आहे. आधीच वाढता उत्पादन खर्च, बाजारभावातील अनिश्चितता आणि नैसर्गिक संकटांचा सामना करणार्या शेतकर्यांवर अवकाळी पावसाने आणखी एक आर्थिक आघात केला आहे. दरम्यान, महसूल व कृषी विभागाने त्वरित संयुक्त पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS