कोल्हापूर: देशातील उच्च शिक्षणाच्या प्रसाराला नवे परिमाण देणारे शिक्षणमहर्षी, पद्मश्री सन्मानाने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तसेच बिहार
कोल्हापूर: देशातील उच्च शिक्षणाच्या प्रसाराला नवे परिमाण देणारे शिक्षणमहर्षी, पद्मश्री सन्मानाने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तसेच बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांचे मंगळवारी कोल्हापुरात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
डॉ. पाटील यांच्या निधनाने शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा या सर्वच क्षेत्रांवर शोककळा पसरली असून राज्यासह देशभरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे हेच आपल्या आयुष्याचे ध्येय मानणाऱ्या या दूरदृष्टीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंत झाल्याने देशाने एक प्रेरणादायी शिक्षणदूत गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
२२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आंबप येथे एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ग्रामीण वातावरणात वाढलेल्या डॉ. पाटील यांनी शिक्षणाच्या बळावर समाजाचा विकास घडवून आणण्याचा निर्धार केला. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे, या विचारातून त्यांनी आयुष्यभर कार्य केले. डॉ. पाटील यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. सन १९५७ ते १९६२ या कालावधीत त्यांनी कोल्हापूरचे महापौर म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९६७ आणि १९७२ मध्ये पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. राजकारणात उल्लेखनीय कारकीर्द घडविल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर जात संपूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्राच्या विकासावर केंद्रित केले.
सन १९८३ मध्ये नवी मुंबई येथे तंत्रज्ञान शिक्षणासाठी एका महत्त्वाच्या संस्थेची स्थापना करून त्यांनी शैक्षणिक कार्याला नवी दिशा दिली. पुढे त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरात विविध शैक्षणिक संस्थांची उभारणी झाली. कोल्हापूर, पुणे, नवी मुंबईसह अनेक शहरांमध्ये त्यांच्या संस्थांमार्फत विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. आज त्यांच्या शैक्षणिक समूहांतर्गत १८० हून अधिक संस्था कार्यरत असून अभियांत्रिकी, वैद्यक, दंतवैद्यक, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, परिचर्या, कृषी, वास्तुरचना, विधी आणि इतर अनेक शाखांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत आधुनिक सुविधा आणि संशोधनाला चालना देण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातही मोठे योगदान शिक्षणाबरोबरच आरोग्य सेवा आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासातही डॉ. पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारी रुग्णालये उभारण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक संस्कार रुजावेत यासाठी त्यांनी आधुनिक क्रीडा संकुले आणि मैदानांची निर्मिती केली. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा या तिन्ही क्षेत्रांचा समन्वय साधण्याचा त्यांचा दृष्टिकोन देशासाठी आदर्श मानला जातो. शिक्षण क्षेत्रातील कार्याबरोबरच त्यांनी घटनात्मक पदांची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली. सन २००९ ते २०१३ या कालावधीत त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम केले. त्यानंतर २०१३ ते २०१४ या काळात बिहारच्या राज्यपालपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांना पद्मश्रीसह अनेक सन्मानांनी भूषवण्यात आले होते.

COMMENTS