Homeताज्या बातम्या

वाहतूक कोंडीने नांदेडचा श्वास गुदमरला: सुटकेसाठी मनपाचा ५० बसेसचा प्रस्ताव, पण १५० बसेसची खरी गरज!

नांदेड: शहरात दिवसेंदिवस फोफावणारी वाहतूक कोंडीची समस्या आता सामान्य नांदेडकरांच्या मुळावर उठली आहे. सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८ या 'पीक अव

विधानपरिषद निवडणूक : मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबणार कधी?; नांदेडमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
जालना-नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बाभुळगाव फाट्यावर बैठक; वाढीव संपादनाचे पोल उपटून फेकले, १८ जूनला रास्ता रोकोचा इशारा

नांदेड: शहरात दिवसेंदिवस फोफावणारी वाहतूक कोंडीची समस्या आता सामान्य नांदेडकरांच्या मुळावर उठली आहे. सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८ या ‘पीक अवर्स’मध्ये शहरातील प्रमुख रस्ते अक्षरशः ठप्प होत आहेत. या प्राणघेण्या वाहतूक कोंडीतून शहराची सुटका करण्यासाठी महापालिकेने शहरात ५० सार्वजनिक बसेस चालवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. मात्र, शहराचा वाढता विस्तार पाहता ही कोंडी फोडण्यासाठी किमान १५० बसेस रस्त्यावर उतरवणे अत्यंत गरजेचे आहे.

पीक अवर्समध्ये शहर ठप्प; अरुंद रस्ते, पार्किंगचा अभाव अन् ऑटोचालकांची मनमानी

शहरातील वजिराबाद, साठे चौक, शिवाजीनगर, तरोडा, छत्रपती चौक, कॅनॉल रोड, राज कॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, भाग्यनगर आणि आनंदनगर चौक या प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणे आता रोजचेच झाले आहे. प्रत्येक घरात वाढलेली दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या, अरुंद रस्ते आणि नियमांची उघडपणे होणारी पायमल्ली यामुळे वाहतुकीचा फज्जा उडाला आहे. शहराच्या चोहोबाजूला नवीन वस्त्यांचा विस्तार झाला आहे, परंतु सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने नागरिकांना ऑटोचालकांच्या मनमानीवर आणि अवाजवी भाड्यावर अवलंबून राहावे लागत आहे. सार्वजनिक बससेवा ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर तातडीने सुरू झाल्यास रस्त्यावरील वैयक्तिक वाहनांची संख्या घटेल आणि प्रवाशांची लूटही थांबेल.

डीपीसी बैठकीत लोकप्रतिनिधी आक्रमक; पालकमंत्र्यांकडे १५० बसेसची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत वाहतुकीच्या या गंभीर प्रश्नावर जोरदार चर्चा झाली. ५० बसेसचा मनपाचा प्रस्ताव अपुरा असून शहरासाठी किमान १५० बसेसची तातडीने मान्यता द्यावी, अशी आक्रमक मागणी लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली.

शहरातील शिवाजीनगर, कौठा, व्हीआयपी रोड व श्रीनगर यांसारख्या व्यापारी भागात नवीन इमारती उभ्या राहत असताना पार्किंगची कोणतीही सोय केली जात नाही. विनापार्किंग इमारतींना मंजुरी मिळतेच कशी, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पार्किंगच्या जागेचा गैरवापर रोखून मनपाने प्रस्तावित केलेले ‘पे अँड पार्क’ धोरण तातडीने अंमलात आणल्यास वाहतुकीला शिस्त लागू शकते. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने राजकीय मतभेद बाजूला ठेवून नांदेडला या वाहतूक कोंडीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी तातडीने १५० बसेसची सेवा सुरू करावी, हीच आता नांदेडकरांची खरी मागणी आहे.

COMMENTS