संगमनेर: सातत्याने मागणी करूनही खरीप हंगामासाठी युरिया खत वेळेवर मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी महायुती सरकारच्या धोरणांविरुद्ध जोरदार

संगमनेर: सातत्याने मागणी करूनही खरीप हंगामासाठी युरिया खत वेळेवर मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी महायुती सरकारच्या धोरणांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत नाशिक-पुणे महामार्गावर सुमारे दीड तास रास्तारोको आंदोलन केले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनास्थळी धाव घेऊन प्रशासनाशी चर्चा करत मध्यस्थी केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपनिरीक्षक विकास ढोकरे यांच्यासह कृषी व प्रशासनाचे विविध अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासकीय नियोजनाचा पुरता बोजवारा: बाळासाहेब थोरात
आंदोलनकर्त्यांशी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्या खरीप हंगाम जोरात सुरू असून पिकांसाठी युरियाची नितांत गरज आहे. शासनाकडे युरियाचा बफर स्टॉक उपलब्ध असूनही तो शेतकऱ्यांना वितरीत करण्यासाठी परवानगी दिली जात नाही. पहाटे पाच वाजल्यापासून शेतकरी व महिला रांगेत उभ्या आहेत, मात्र अत्यंत मर्यादित साठा आल्याने तो लगेच संपतो. वेळेवर खते उपलब्ध करून देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे, परंतु राज्य सरकारचे खत वाटपात कोणतेही नियोजन नसून अत्यंत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तर दुसरीकडे खतांची भाववाढ आणि काळाबाजार सुरू असून त्यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही.
प्रशासनाने त्यांच्या ताब्यातील बफर स्टॉक तातडीने खुला करावा, अशी सूचना बाळासाहेब थोरात यांनी कृषी विभागाला दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी उपलब्ध साठा देण्याचे मान्य केले. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.
युरिया वाटपाचे अधिकार शेतकी संघाला देण्याची मागणी
संगमनेर तालुका शेतकी संघ अत्यंत पारदर्शकपणे काम करत असल्याने, शासनाच्या ताब्यातील बफर स्टॉकमधील सर्व युरिया वितरणाचे अधिकार केवळ शेतकी संघालाच दिले जावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. खासगी खत विक्री केंद्रांना परवानगी दिल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना इतर खते लिंकिंग करून दिली जातात, त्यामुळे हा गोंधळ टाळण्यासाठी सर्व अधिकार शेतकी संघालाच द्यावेत, असा सूर यावेळी उमटला.

COMMENTS