अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या मानोरी गावातून एक हटके आणि कौतुकास्पद बातमी समोर आली आहे. एका गाईला तब्बल २ लाख २१ हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळाल्या

अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या मानोरी गावातून एक हटके आणि कौतुकास्पद बातमी समोर आली आहे. एका गाईला तब्बल २ लाख २१ हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळाल्यानंतर शेतकऱ्याने या गाईची चक्क डीजेच्या तालावर मिरवणूक काढत वाजतगाजत निरोप दिला. मानोरी गावातील हे दृश्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. डीजेचा दणदणाट, ग्रामस्थांची मोठी गर्दी, गाईची पूजा, फुलांचा हार आणि त्यानंतर वाजतगाजत मिरवणूक… एखादा मोठा सोहळा असल्याचं चित्र मानोरी गावात पाहायला मिळालं. पण ही मिरवणूक नेमकी कशासाठी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तब्बल २ लाख २१ हजार रुपयांना विकल्या गेलेल्या जातिवंत गाईसाठी ही भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मानोरी येथील तरुण दूध उत्पादक शेतकरी गजानन थोरात यांनी या गाईचं उत्तम संगोपन केलं. योग्य आहार, नियमित देखभाल, स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेतल्यामुळे या गाईची दूध देण्याची क्षमता तब्बल ४० लिटरपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. गाईला विक्रमी भाव मिळाल्याची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने तिचं दर्शन घेतलं. गाईची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर डीजेच्या तालावर मिरवणूक काढत तिला निरोप देण्यात आला. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे अनेक तरुण शेती आणि पशुपालनापासून दूर जात आहेत. मात्र, योग्य नियोजन, मेहनत आणि पशुधनाचं उत्तम संगोपन केलं तर दुग्ध व्यवसायातूनही चांगलं उत्पन्न मिळवता येऊ शकतं, हे गजानन थोरात यांनी दाखवून दिलं आहे. त्यामुळे मानोरी गावातील ही विक्रमी गाय विक्री आणि तिची काढण्यात आलेली मिरवणूक सध्या परिसरात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

COMMENTS