भोकर : भोकर शहरासह तालुक्यातील नागरिकांची रोजची वर्दळ असलेल्या भाजीपाला मार्केटमध्ये सध्या चिखल, साचलेले पाणी, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य

भोकर : भोकर शहरासह तालुक्यातील नागरिकांची रोजची वर्दळ असलेल्या भाजीपाला मार्केटमध्ये सध्या चिखल, साचलेले पाणी, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. साधा पाऊस झाला तरी संपूर्ण परिसरात पाणी साचून रस्त्यांना चिखलाचे स्वरूप येत असल्याने भाजीपाला खरेदीसाठी येणार्या नागरिकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. या गंभीर समस्येकडे मार्केट कमिटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
भोकर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही प्रतिष्ठित संस्था असून, नव्याने अद्ययावत आणि सुविधासंपन्न स्वरूपात बाजारपेठ उभारण्यात आली आहे. मात्र, सुविधांची मोठी चर्चा असतानाही प्रत्यक्ष भाजीपाला मार्केटमध्ये नागरिकांना चिखल आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने या सुविधांचा नेमका उपयोग कोणासाठी?, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यात भाजी मार्केटमधील अनेक रस्त्यांवर पाणी साचते. रस्ते सखल असल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास योग्य निचरा व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. परिणामी काही तास पाऊस झाला तरी रस्त्यांवर चिखल तयार होतो. याच चिखलातून नागरिक, शेतकरी आणि व्यापार्यांना ये-जा करावी लागते.
भाजीपाला विक्रेते दररोज सुमारे दहा तास याच परिसरात बसून व्यवसाय करतात. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या बाजारपेठेशी जोडलेला आहे. मात्र, साचलेले पाणी, चिखल आणि दुर्गंधी यामुळे विक्रेत्यांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अस्वच्छ वातावरणामुळे त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे विविध आजार पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. भाजीपाला खरेदीसाठी येणार्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनाही या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत आहे.
भाजीपाला मार्केटमधील रस्त्यांची उंची वाढविण्यासाठी आवश्यक ठिकाणी योग्य भराव टाकणे, पावसाचे पाणी तातडीने वाहून जाण्यासाठी प्रभावी निचरा व्यवस्था निर्माण करणे, चिखलाची समस्या दूर करणे आणि परिसराची नियमित स्वच्छता राखणे आवश्यक आहे. केवळ पाऊस झाल्यानंतर तात्पुरती साफसफाई करण्याऐवजी पावसाळ्यापूर्वीच नियोजन करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. बाजार समिती प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून समस्या नेमकी कुठे आहे, याचा आढावा घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. शेतकरी, भाजीपाला विक्रेते आणि ग्राहक हे बाजार समितीच्या व्यवस्थेचा प्रमुख भाग आहेत. त्यांच्या मूलभूत सुविधांकडेच दुर्लक्ष होत असेल तर अद्ययावत बाजारपेठ उभारण्याचा नेमका उद्देश काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे मार्केट कमिटी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून चिखल, दुर्गंधी आणि अस्वच्छतेतून नागरिकांची कायमस्वरूपी सुटका करावी, अशी जोरदार मागणी भोकरकरांतून होत आहे.

COMMENTS