Homeताज्या बातम्या

वीज ग्राहकांना 24 तास सुरळीत वीजपुरवठा करा : आ.आनंदराव पाटील बोंढारकर

नांदेड : नांदेड शहरासह ग्रामीण भागातील कृषी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांना सुरळीत व 24 तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा. वीजविषयक रखड

अंबाजोगाईत अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथेचे आयोजन
उद्धव ठाकरेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश, एकनाथ शिंदेंनाही समन्स जारी
सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत राष्ट्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

नांदेड : नांदेड शहरासह ग्रामीण भागातील कृषी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांना सुरळीत व 24 तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा. वीजविषयक रखडलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. ग्राहकांना त्रास देणार्‍या किंवा कामात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिला.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आमदार बोंढारकर यांनी तरोडा नाका येथील महावितरण कार्यालयात संयुक्त बैठक घेतली. यावेळी अधीक्षक अभियंता संजय खंडारे, कार्यकारी अभियंता शैलेश कलंत्री, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. एन. कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि मतदारसंघातील सर्व लाईनमन उपस्थित होते. नांदेड दक्षिण मतदारसंघात वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत असल्याचे आमदार बोंढारकर यांनी निदर्शनास आणून दिले. या मतदारसंघात एमआयडीसीसह अनेक उद्योग-व्यवसाय आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर शेती असून सिंचनासाठी वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योग-व्यवसायांचे नुकसान होत आहे. शेतीच्या सिंचनावरही त्याचा परिणाम होत असून, लघु व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वीजपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून ग्राहकांना दिलासा देण्याच्या सूचना आमदारांनी अधिकार्‍यांना दिल्या.

एखाद्या परिसरातील डीपी जळाल्यानंतर तो अनेक दिवस बदलला जात नसल्याने संबंधित भागातील वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित राहतो. नवीन डीपी बसविल्यानंतरही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर जळालेला डीपी तातडीने बदलून नवीन डीपी बसवावा, तसेच डीपीची क्षमता, लोड आणि तांत्रिक स्थिती यांची नियमित तपासणी करावी, असे निर्देश आमदार बोंढारकर यांनी दिले. मतदारसंघातील सर्व वीज उपकेंद्रांशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत. नवीन सर्व्हिस स्टेशनची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. शेतीपंपांचा वीजपुरवठा आणि घरगुती व व्यावसायिक ग्राहकांचा वीजपुरवठा यामध्ये आवश्यक तांत्रिक नियोजन करून दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना सुरळीत वीज उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि तांत्रिक साधनांची कमतरता असल्यास त्याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना तातडीने कळवून उपाययोजना कराव्यात, असेही बैठकीत सांगण्यात आले. सर्वसामान्य वीज ग्राहकांना समाधानकारक सेवा देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून कामात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यास कोणतीही हयगय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार बोंढारकर यांनी दिला. ‘तक्रार आल्यानंतर केवळ आश्वासन नको; प्रत्यक्ष काम झाले पाहिजे,’ अशी भूमिका घेत त्यांनी प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन निर्धारित वेळेत समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या.

बैठकीस शिवसेना शहरप्रमुख तुलजेश यादव, युवासेना जिल्हाप्रमुख बाळू पाटील मोरे, महानगरप्रमुख दीपक स्वामी, संतोष जाधव तसेच सहायक अभियंते बळीराम तोडेवाड, तुषार वाघमारे, पुंजाजी साखरे, दालधन मोरे, प्रियांका तामलवाड, राखे यांच्यासह नांदेड दक्षिण मतदारसंघातील महावितरणचे सर्व लाईनमन उपस्थित होते.

COMMENTS