विदेशी भांडवलदारांची चोपदार असणारी समिती !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

विदेशी भांडवलदारांची चोपदार असणारी समिती !

क्रमशः (भाग -२) : हिंदू राष्ट्र अधिवेशनाच्या घोषाखाली हिंदू राष्ट्राची आवश्यकता का, याची भूमिका मांडतांना हिंदू जनजागरण समिती अत्यंत तकलादू आणि तितके

पन्नास लोकांचे सरकार अधिकार्‍यांच्या बदल्यात दंग : अजित पवार
Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको : छगन भुजबळ | LOKNews24
साताऱ्यात जोरदार राडा… उदयनराजे- शिवेंद्रराजेंचे समर्थक भिडले…

क्रमशः (भाग -२) : हिंदू राष्ट्र अधिवेशनाच्या घोषाखाली हिंदू राष्ट्राची आवश्यकता का, याची भूमिका मांडतांना हिंदू जनजागरण समिती अत्यंत तकलादू आणि तितकेच घासपूस केलेले तर्क पुढे आणून, हसे करून घेत आहे. मुळातच कालच्या लेखात आम्ही सांगितल्याप्रमाणे ही समिती ब्राह्मण श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी हिंदू च्या अजेंड्यावर काम करते आहे. त्यांच्या मते भारत हा पूर्वी हिंदू राष्ट्र होता आणि १९४७ ला त्यातून इस्लामधर्मावलंबी पाकिस्तान निर्माण झाले, तेव्हाच हिंदू राष्ट्र निर्माण झाले पाहिजे होते, असे सांगून ते एवढ्यावरच थांबत नाहीत; तर, हा देश हिंदूंचा असूनही तेव्हाच हिंदुस्थानचे निर्माण करून हिंदू राष्ट्र स्थापन करायला हवे होते. परंतु, तसे न करता १९७६ ला संविधान दुरूस्ती करून त्यात सेक्युलर हा शब्द टाकण्यात आला. या समितीचे हे म्हणणे संविधानावर आक्षेप नोंदविणारे आहे. संविधानावर या देशात फक्त एकाच संघटनेने आक्षेप नोंदवला आहे, तो म्हणजे आर‌एस‌एसने. तोच आक्षेप हिंदू जनजागरण समितीच्या माध्यमातून जेव्हा पुढे येतो, तेव्हा हे देखील सिद्ध होते की, ही समिती आर‌एस‌एस च्या नियंत्रणाखाली काम करणारी आहे. आर‌एस‌एस या संघटनेविषयी हे जाहीरच आहे की, ते हिंदूत्वा च्या नावाखाली देशाला ब्राह्मण श्रेष्ठत्वाकडे नेत आहेत. या समितीने मेरूतंत्र चा दिलेला संदर्भ देखील ब्राह्मण श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचाच एक भाग आहे, हे आम्ही कालच्या लेखात मांडलेले आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की, संविधान दुरूस्ती करून या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करावं. मुळातच या समितीने ज्या सेक्युलर शब्दावर आक्षेप नोंदवला होता, त्यावर संघ भाजपने धर्मनिरपेक्ष ऐवजी पंथनिरपेक्ष असा शब्द योजला आहे. त्यावर बरेच वाद झाले असल्याने इथे त्यावर चर्चा टाळूया. हिंदूंवर आजही अत्याचार सुरू असल्याचे सांगून लव जिहाद च्या माध्यमातून कसे अत्याचार होताहेत हे सांगणाऱ्या या समितीला हिंदू धर्मातील दोन जातींमध्ये होणाऱ्या लग्नांतील वधू-वरांच्या ऑनर किलिंग च्या माध्यमातून दिवसाढवळ्या होणारे खून दिसत नाहीत का! कित्येक राज्यांमध्ये घोड्यावर बसला म्हणून हिंदू वराला सोलून काढण्याचे काम हिंदूच करतात, तेव्हा ही समिती मौन पाळून गायब का राहते, याचे उत्तर आधी द्यायला हवे. प्रेम करणे आणि त्यातून विवाह करणे हे १८ वर्षे पूर्ण केलेली युवती आणि २१ वर्षे वयाची पूर्ण केलेल्या युवकाला आपल्या मर्जीने आणि एकमेकांच्या संमतीने विवाह करण्यास भारतीय संविधान स्वातंत्र्य देते. आपले जीवन कोणाबरोबर जगावं याचा नैसर्गिक अधिकार हिंसाचार करून मिटवू पाहणारी ही समिती अशा दोन जातींच्या संघर्षात काय भूमिका घेते, हे आधी त्यांनी जाहीरपणे सांगावं आणि मगच हिंदूंची ठेकेदारी घ्यावी, असा आमचा त्यांना थेट सल्ला आहे! हिजाब आणि शेतकरी आंदोलनाचे टूलकिट वापरून हिंदूत्वाला बदनाम केले जात असल्याचा तकलादू आरोप करणाऱ्या या समितीने हे भानही सोडले की, न‌ऊ महिने आंदोलन करून आपली शेते आणि शेतकरी जीवन वाचविण्यासाठी पाचशे शेतकऱ्यांनी बलिदान दिले. तरीही, यांच्या हिंदूराष्ट्र धार्जिणे सरकारला त्या आंदोलनातील शेतकऱ्यांशी बोलणी करण्याची किंवा आंदोलनाला भेट देण्याची बुध्दी आणि भावना झाली नाही, हे कशाचे प्रतिक आहे? देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ऊन, पाऊस, वारा सोसत उघड्यावर शहीद होत होते. ते शेतकरी हिंदूच होते, हे सांगण्यासाठी यांना काय एखाद्या विद्यापीठाच्या संशोधनातूनच सिध्द करून सांगण्याची आवश्यकता आहे का? तसे असेल तर मग ही समिती केवळ ब्राह्मण श्रेष्ठत्वच प्रस्थापित करण्यासाठी नसून विदेशी भांडवलदारांची चोपदार बनल्याचेही ते द्योतक म्हणावे लागेल! कारण तीन कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचे सांगून शेतकरी आणि विरोधी पक्षांनी भूमिका घेतली होती. अखेर न‌ऊ महिन्यांनी ते कायदे मागे घ्यावे लागले, तेव्हा हे देखील स्पष्ट झाले की, ते कायदे विदेशी भांडवलदार आणि कंपन्यांना भारतीय शेतीत मुक्त मालकी प्रदान करणारे होते. या विश्लेषणाच्या आजच्या दुसऱ्या भागात हे देखील स्पष्ट होते की, हिंदू जनजागरण समिती केवळ ब्राह्मण श्रेष्ठत्वच नव्हे, केवळ भांडवलदारांसाठीच नव्हे तर, विदेशी भांडवलदारांना भारतीय शेती आंदण देण्याच्या कामातही अग्रेसर आहे; तेव्हा, राष्ट्रवादावर बोलण्याचा या समितीला नैतिक अधिकार तरी आहे काय!

COMMENTS