सिन्नर : सिन्नर तालुक्यातील दोंडी (धोंडी बुद्रुक) येथे कुंभार समाजातील संगीता मधुकर जाधव या महिलेचे राहत्या घरातून अपहरण करून हत्या करण्यात आल्या

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील दोंडी (धोंडी बुद्रुक) येथे कुंभार समाजातील संगीता मधुकर जाधव या महिलेचे राहत्या घरातून अपहरण करून हत्या करण्यात आल्याची आणि त्यांचा मृतदेह जवळच असलेल्या विहिरीत फेकून दिल्याची दुर्दैवी व संतापजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत संगीता यांच्या १३ वर्षांच्या मुलीवर दोन दिवसांपूर्वी अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. रविवारी (दि. ९ ऑगस्ट) संगीता यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी समस्त कुंभार समाज बांधवांनी पक्ष व गट-तट विसरून सोमवारी (दि. १० ऑगस्ट) सकाळी ११ वाजता दोंडी येथे एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, दोंडी बुद्रुक येथील या निंदनीय घटनेचा कळवण तालुक्याच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालयांत कुंभार समाज बांधवांनी निवेदने देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या नराधमांना त्वरित फाशी देणारा कायदा शासनाने करावा, तसेच दोषींना सहकार्य करणाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हावी, यासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन व उपोषण करण्याचे नियोजन केले जात आहे.
कळवण तालुका कुंभार समाज बांधव, अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तसेच संत गोरोबाकाका व केरबा महाराज वारकरी परिवाराच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून, पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी तत्पर राहण्याची ग्वाही सोमनाथ पुजाराम सोनवणे, दत्तात्रय निंबाजी मोरे व विजय वामनराव चव्हाण (आभोणा, ता. कळवण, जि. नाशिक) यांनी दिली आहे.

COMMENTS