Homeताज्या बातम्या

केरळमध्ये आज मान्सून दाखल होण्याची शक्यता; मान्सूनपूर्व पावसाने महाराष्ट्राला काहीसा दिलासा

मुंबई : राज्यातील वाढत्या उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा दिला आहे. कोकण, मराठवाडा आणि राज्यातील इतर अनेक

अखेर मान्सून मुंबईत दाखल; महाराष्ट्राचा ७५ टक्के भाग व्यापला, जुन्नरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस
मान्सूनच्या प्रगतीत अडथळे; महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा, देशात सरासरीपेक्षा ६४ टक्के पाऊस कमी
यंदा पाऊस लांबतोय : निसर्ग की कृत्रिम प्रयोग? जाणून घ्या काय सांगते विज्ञान!

मुंबई : राज्यातील वाढत्या उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा दिला आहे. कोकण, मराठवाडा आणि राज्यातील इतर अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाची हजेरी लागल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागानेही राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला असून पुढील काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. केरळ किनारपट्टीवर आज गुरुवारी मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता असून त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल. मान्सून राज्यात दाखल होण्यापूर्वीच अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

राज्यातील काही भागांत अद्यापही उष्णतेची तीव्रता कायम आहे. ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, धुळे, परभणी, मालेगाव, गोंदिया आणि अमरावती या ठिकाणीही तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले आहे. तरीही जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील सरासरी तापमान नेहमीपेक्षा दोन ते चार अंशांनी कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, महिन्याच्या उत्तरार्धात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी उष्णतेची जाणीव होऊ शकते.

मात्र याच काळात या भागांत पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने खरीप हंगामासाठी ते लाभदायक ठरणार आहे. विशेषतः तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे खरीप पिकांसाठी आवश्यक असलेली जमिनीतील ओळ (ओलावा) टिकून राहण्यास मदत होईल. कृषी क्षेत्रासाठी हा पाऊस महत्त्वाचा मानला जात असून शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. सध्या अरबी समुद्र परिसरातून मान्सूनची वाटचाल सुरू असून राज्यात त्याचे आगमन वेळेवर होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाचा पावसाळा समाधानकारक राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत असून शेतकरी वर्ग मान्सूनच्या नियमित पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे.

दरम्यान, काही भागांत अवकाळी पावसाचाही प्रभाव कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी पुढील काही दिवस हवामानातील बदलांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील नागरिकांसह शेतकरी वर्गासाठी येणारा काळ महत्त्वाचा ठरणार असून मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS