मुंबई : राज्यात चातकासारखी वाट पाहायला लावणाऱ्या मोसमी पावसाने (मान्सून) अखेर मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत जोरदार आगेकूच केली आहे. नैऋत्य

मुंबई : राज्यात चातकासारखी वाट पाहायला लावणाऱ्या मोसमी पावसाने (मान्सून) अखेर मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत जोरदार आगेकूच केली आहे. नैऋत्य मान्सून मुंबईत अधिकृतपणे दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाकडून (IMD) जाहीर करण्यात आले आहे. २३ जून रोजी सकाळपासूनच राज्याच्या विविध भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळत होता.
मान्सूनने मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, जालना, बुलढाणा, वाशिम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हजेरी लावत आतापर्यंत ७५ टक्के महाराष्ट्र व्यापला आहे. खान्देशसहित उर्वरित २५ टक्के भागात मान्सून पोहोचण्यासाठी हवामान परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे. २२ आणि २३ जून दरम्यान मान्सूनने वेगाने प्रगती करत मुंबईसह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांना कवेत घेतले आहे. यंदा केरळमध्ये उशिराने दाखल झालेल्या मोसमी पावसाने मुंबईतही सरासरी तारखेच्या १२ दिवस उशिराने आगमन केले आहे. मे आणि जून महिन्याच्या सुरुवातीला उत्तर कोकणावर उष्ण वाऱ्यांचा प्रभाव असल्याने उन्हाचा तडाखा अधिक होता, मात्र आता उर्वरित जूनमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.
पुढील २ ते ३ दिवस अत्यंत महत्त्वाचे
महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर आता मान्सूनचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र व छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशातील काही नवीन भागांमध्ये पुढे सरकण्याची दाट शक्यता आहे. या काळात मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर आणखी वाढू शकतो.
जुन्नर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस

मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुण्यातही तुफानी पाऊस बरसला. जुन्नर तालुक्यातील कुमशेत परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे रस्ते, ओढे आणि नाल्यांना थेट नद्यांचे स्वरूप आले होते. अचानक आलेल्या या पुरामुळे स्थानिक नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, शेतीचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

COMMENTS