Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा विलंब विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी; वेळबद्धतेची मागणी तीव्र

नांदेड : रविवार, 3 मे रोजी पार पडलेल्या ‘नीट’ परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी व पालकांनी काहीसा सुटकेचा निःश्‍वास घेतला असला, तरी खरी चिंता आता पुढील

आनंद दत्तधाम आश्रमात अधिक मास निमित्त पूर्वतयारी निमंत्रण बैठक
किनवटमध्ये दिव्यांग कर्मचार्‍याला नगरसेवकाची मारहाण; काम बंद आंदोलनाचा इशारा!
फटाक्यांच्या अतिरेकाने तणाव: भाजपा कार्यकर्त्यांची अरेरावी, पोलिसांशी खडाजंगी
NEET Exam 2026 | 3 May, Syllabus, Admit Card & Result

नांदेड : रविवार, 3 मे रोजी पार पडलेल्या ‘नीट’ परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी व पालकांनी काहीसा सुटकेचा निःश्‍वास घेतला असला, तरी खरी चिंता आता पुढील प्रवेश प्रक्रियेभोवती फिरू लागली आहे. साधारण दहा ते पंधरा दिवसांत निकाल लागल्यानंतर वैद्यकीय प्रवेशाचे गुंतागुंतीचे चक्र सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अनिश्‍चिततेचे वातावरण आहे.
देशातील सर्वात प्रतिष्ठित व स्पर्धात्मक मानल्या जाणार्‍या वैद्यकीय शिक्षणासाठी दरवर्षी तब्बल 20 ते 25 लाख विद्यार्थी ‘नीट’ परीक्षा देतात. डॉक्टर होण्याच्या ध्येयासाठी अनेक विद्यार्थी दोन ते तीन वर्षे कोचिंगमध्ये झोकून देतात, तर पालक लाखो रुपयांची गुंतवणूक करतात. मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सहा ते सात महिन्यांपर्यंत लांबली. जुलैमध्ये सुरू झालेली प्रक्रिया जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत चालल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. अभ्यासाची सलगता तुटणे, अनिश्‍चिततेमुळे निर्माण होणारा ताण आणि पर्याय शोधण्याची वेळ येणे, या समस्या प्रकर्षाने जाणवल्या. प्रवेश प्रक्रियेत होणार्‍या विलंबामागे अनेक कारणे पुढे येतात. मोठ्या प्रमाणातील विद्यार्थ्यांची संख्या, गुणवत्ता यादीतील आरक्षण व कॅटेगरीसंदर्भातील आक्षेप, त्यातून निर्माण होणारी न्यायालयीन प्रकरणे, तसेच प्रवेशाच्या फेर्‍यांची वाढलेली संख्या यामुळे वेळकाढूपणा वाढतो. याशिवाय केंद्र व राज्य पातळीवरील स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया आणि वेगवेगळे नियम यामुळे समन्वयाचा अभाव जाणवतो.
दरम्यान, मध्यमवर्गीय पालकांमध्ये वाढत्या खर्चामुळे चिंता व्यक्त होत आहे, तर ‘रिपीटर’ विद्यार्थ्यांसमोर पुढील नियोजनाचे प्रश्‍न उभे ठाकले आहेत. यंदा महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणाच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी त्या वाढीचा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना नेमका किती फायदा होणार, याबाबत प्रश्‍नचिन्ह कायम आहे. माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनीही या विलंबाबाबत चिंता व्यक्त करत, प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया काटेकोरपणे वेळबद्ध करणे अत्यावश्यक आहे, असे मत नोंदवले. एकूणच, ‘नीट’नंतरची प्रवेश प्रक्रिया सुकर, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आता विद्यार्थी, पालक आणि तज्ज्ञांकडून जोर धरू लागली आहे.

COMMENTS