Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर शाईफेक

गाडीला चपलांचा हार घालत चिकटवले धमकीचे पत्र

सांगली ः ऐन उन्हाळ्यात लोकशाही निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असतांना, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडतांना दिसून येत अ

अकोल्यात झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू
जनतेचे कामे करणे हेच माझे कर्तव्य-एल.आर.वाजे
स्वाभिमानी करणार 22 दिवस आत्मक्लेश आंदोलन

सांगली ः ऐन उन्हाळ्यात लोकशाही निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असतांना, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडतांना दिसून येत असतांना ओबीसी नेते आणि ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलांचा हार घालण्यात आला. तसेच त्यांच्या गाडीवर शाई फेकण्यात आली असून, त्यांना धमकी देणारे पत्र देखील त्यांच्या गाडीच्या काचेवर चिकटवण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, ओबीसी नेते शेंडगे यांची कार हॉटेल ग्रेट मराठासमोर उभी असतांना रात्री अज्ञातांकडून त्यांच्या गाडीवर चपलांचा हार लटकवत धमकी देण्यात आली आहे.  या संपूर्ण प्रकरणाचा प्रकाश शेंडगे यांनी निषेध केला असून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. शेंडगे यांच्या काचेवर एक धमकीचे पत्र लावण्यात आले आहे. यामध्ये ’’प्रकाश शेंडगे तुला मराठा समाज पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, भुजबळाने जशी नाशिकमध्ये माघार घेतली तशी तू घे वेड्या. धनगर आणि मराठ्यांच्या नादी लागू नका, नाहीतर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मराठ्याला विरोध केला तर पुढीलवेळी चपलेला हार गळ्यात घालू. एक मराठा लाख मराठा’’ अशी धमकी देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार – ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग गावात मराठा समाजाच्या तरुणांकडूनही दमदाटी व शिवीगाळ केल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. प्रचार सुरू असताना खरशिंग गावामध्ये मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांकडून गावात प्रचार साहित्य वाटू देण्यात आले नाही. तसेच आपणाला आणि छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाला विरोध केल्याच्या भावनेतून शिवीगाळ देखील केल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केले आहे.

मराठा विरूद्ध ओबीसींमध्ये तणावाचा प्रयत्न – सांगली जिल्ह्यात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे लोकसभा निवडणुकीला उभे असून, या निवडणुकीत ते प्रचारात आघाडी घेतांना दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सांगली मतदारसंघात ओबीसी विरूद्ध मराठा असा वाद तथाकथित कार्यकर्त्यांकडून उभा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातूनच शेंडगे यांना धमकी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS