बीड : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीविरोधात बीड शहर पोलिसांनी धडक कारवाई करत पाच ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत विविध कंपनीचा

बीड : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीविरोधात बीड शहर पोलिसांनी धडक कारवाई करत पाच ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत विविध कंपनीचा गुटखा, पान मसाला, मोबाईल फोन तसेच वाहन असा एकूण सुमारे 8 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गुटखा विक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जनजागृती मोहीमही राबविण्यात आली होती. मात्र, तरीही काही ठिकाणी गुप्तपणे गुटखा विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर दि. 15 व 16 एप्रिल 2026 रोजी बीड शहर पोलिसांनी वेगवेगळ्या भागांत छापेमारी कारवाई केली. या कारवाईत खालील आरोपींकडून गुटखा साठा जप्त करण्यात आला: नामदार मोहिदीन शेख (रा. शहाशाह नगर, अक्सा मशिद जवळ), समशेर खान मुस्तफा खान (रा. गुलजार नगर, तकिया मशिद परिसर), मोमीन अब्दुल मुजिब (रा. किशोर मेहता रोड, किराणा दुकान), अफरोज यासीन तांबोळी (रा. इस्लामपुरा, पंडित बंधू परिसर), लक्ष्मण दत्तूबा वाघुले (रा. नायगाव, ता. पाटोदा), विशेष म्हणजे, लक्ष्मण वाघुले याच्या ताब्यातील वाहनातून सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, गुरुकृपा हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा साठा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संपूर्ण साठा जप्त केला. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपासात आणखी ठिकाणांवर छापे टाकले. या कारवाईत गुटखा व पान मसाल्यासह मोबाईल फोन आणि एक वाहन असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 81/2026 नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत कलम 123, 223, 274, 275 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव तसेच पोलीस अंमलदार गहिनीनाथ बावनकर, सय्यद शहेनशहा, इलियास शेख, मंगेश शिंदे, राम पवार, फारुख शेख यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान, बीड शहर पोलिसांनी सर्व टपरी चालक, किराणा दुकानदार आणि संबंधित व्यावसायिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, गुटखा विक्री केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती त्वरित पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. अवैध गुटखा विक्रीमुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेता, पोलिसांनी ही मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

COMMENTS