Homeताज्या बातम्या

कामाच्या आमिषाने जाळे; अश्लील व्हिडिओच्या धमकीवर लाखाची खंडणी! भाग्यनगर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत ५ जण जेरबंद

नांदेड: काम देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला जाळ्यात ओढून त्याचे अश्लील फोटो व व्हिडिओ चित्रीत करत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि बलात्कारा

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वप्नपूर्ती करा; पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचे शेवगावमधील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन
मरखेल पोलिसांची मोठी कामगिरी; १ लाख ५७ हजारांचे ७ चोरीचे मोबाईल हस्तगत करून मालकांना केले परत
माहिती दडपून भ्रष्टाचार लपविण्याचा आरोप; मुख्याधिकार्‍यांच्या निषेधार्थ राकेश साळवे आमरण उपोषणावर

नांदेड: काम देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला जाळ्यात ओढून त्याचे अश्लील फोटो व व्हिडिओ चित्रीत करत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत धडाकेबाज कारवाई करत एका महिलेसह पाच आरोपींना अटक करून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

३१ जुलै २०२६ रोजी फिर्यादीला एका महिलेने मोबाईलवर संपर्क साधून ड्रायव्हरची आवश्यकता असल्याचे सांगत बेलानगर परिसरातील ढवळे कॉर्नर येथे बोलावले. फिर्यादी तेथे पोहोचताच संबंधित महिला आणि तिच्या साथीदाराने त्यांना बोलण्यात गुंतवून जवळील एका घरात नेले. तेथे आरोपींनी बळजबरीने फिर्यादीचे कपडे उतरवून मोबाईलद्वारे अश्लील फोटो व व्हिडिओ चित्रीत केले.

यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत एक लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. एवढ्यावरच न थांबता फिर्यादीच्या हातातील सुमारे आठ ग्रॅम वजनाची आणि अंदाजे १.२० लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी देखील जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२), ३०८(३), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी संतोष तांबे, पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख आणि गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त माहितीच्या आधारे तातडीने कारवाई करत शिला सुनील भदरगे, इंदुबाई विठ्ठलराव बाहाटे, सुनिता रामकांत सोनकांबळे, रेखा रामचंद्र इंगोले आणि अमन मारोती कांबळे या पाच आरोपींना अटक केली.

आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन स्कुटी, एक ऑटो रिक्षा, चार मोबाईल फोन आणि लुटलेली सोन्याची अंगठी असा एकूण ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, अशा हनी ट्रॅपच्या माध्यमातून नागरिकांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळणार्‍या टोळ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. अनोळखी व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये, कोणत्याही संशयास्पद बोलावण्याची खातरजमा करावी आणि अशा प्रकारची घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी अथवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS