किनवट: महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा आगामी ६ ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत नांदेड जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या
किनवट: महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा आगामी ६ ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत नांदेड जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय दौर्यात जिल्ह्यातील आदिवासी विकास योजना, नोकरभरती, पदोन्नती, आरक्षण, अनुशेष आणि जात पडताळणी प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला जाणार असल्याची माहिती विधानमंडळ सचिवालयाचे सहसचिव राजेश तारवी यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्राद्वारे दिली आहे.
या दौर्यादरम्यान समिती जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नांदेड-वाघाळा महानगरपालिका, पोलीस अधीक्षक कार्यालय, सर्व नगरपालिका व नगरपंचायती, महावितरण, राज्य उत्पादन शुल्क, एसटी महामंडळ, तसेच किनवट येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्या कामकाजाची आणि विविध योजनांची कडक तपासणी करणार आहे.
२०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीचा घेणार आढावा
समिती सन २०२२-२३ ते २०२५-२६ या चार वर्षांच्या कालावधीतील अनुसूचित जमातीच्या अधिकारी व कर्मचार्यांची भरती, पदोन्नती, आरक्षण अनुशेष आणि कल्याणकारी योजनांवर झालेला खर्च याचा सविस्तर आढावा घेईल. तसेच किनवट प्रकल्प कार्यालयांतर्गत येणार्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, आदिवासी पाड्यांमधील रस्ते व विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.
प्रलंबित जात पडताळणीबाबत कडक निर्देश
आदिवासी जमाती जात पडताळणी समिती, किनवट (मुख्यालय छत्रपती संभाजीनगर) यांनी जिल्ह्यातील कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जांपैकी किती प्रकरणे वैध अथवा अवैध ठरवली आणि किती प्रकरणे प्रलंबित आहेत, याचा सविस्तर अहवाल बैठकीपूर्वी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दौर्यासाठी योग्य ती सुरक्षा यंत्रणा, पोलीस एस्कॉर्ट, निवास आणि वाहतूक व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत.

COMMENTS