बीड: दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ बीड जिल्हा काँग्रेस क

बीड: दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी (दि. २६ जुलै) सायंकाळी ७ वाजता कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. हा मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा स्मारक, राजीव गांधी चौक या मार्गावर काढण्यात येणार आहे.
काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, नीट (NEET), टीईटी (TET) आणि सीबीएसई (CBSE) यांसारख्या विविध परीक्षांच्या कथित पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, या प्रकरणांबाबत केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
दिल्लीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी, युवक आणि पालक विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असून, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी हा कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार तसेच माजी खासदार रजनीताई अशोकराव पाटील यांच्या सूचनेवरून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हा मार्च आयोजित करण्यात आला आहे. या कॅन्डल मार्चमध्ये विद्यार्थी, युवक, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बीड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील आणि शहराध्यक्ष इलियास टेलर यांनी केले आहे.

COMMENTS