शेवगाव: दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी आयोजित करण्यात

शेवगाव: दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या शेवगाव शहर बंदच्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या निर्देशानुसार आणि पक्षाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा बंद यशस्वीरीत्या पाळण्यात आला.
या आंदोलनाला काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय बौद्ध महासभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच विविध समविचारी पक्ष व सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. शहरातील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली आस्थापने बंद ठेवून या आंदोलनात सहभाग नोंदवला.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे शहरातील वातावरण परिसर आंदोलनमय झाला होता. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.
क्रांती चौकात निषेध सभा
आंदोलनानंतर क्रांती चौक येथे भव्य निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, अविनाश मगरे, प्रा. विजय हुसळे, बाळासाहेब धस, कॉ. गोरक्ष काकडे, अजिंक्य लव्हाटे तसेच कॉ. दत्ता आरे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रा. किसन चव्हाण यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या धोरणांवर कडक शब्दांत टीका केली. लोकशाही, संविधान, शिक्षण व्यवस्था, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील विद्यार्थ्यांचे हे आंदोलन आता एका व्यापक जनआंदोलनाचे रूप धारण करत असून सर्व समाजघटकांनी लोकशाहीच्या मार्गाने या संघर्षात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शेख प्यारेलालभाई, युवा तालुकाध्यक्ष भन्ते धम्मपाल, युवा तालुकाध्यक्ष ऑगस्टिन गजभीव, लक्ष्मण मोरे, संजय लहासे, संतोष पटवेकर, कॉ. बबनराव पवार, शेख सलीम जिलानी, गोरख तुपविहिरे, संदीप घाडगे, अरुण खर्चन, रामभाऊ गुंजाळ, सुरेश खंडागळे, रामभाऊ खंडागळे, दिलीप वाघमारे, अशोक लोढे पाटील, लुकास गजभीव, रवींद्र निळ, रवी जगधने, सोमनाथ भंडारे, राजू जगधने यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS