नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धांच्या तयारीदरम्यान भारताची आघाडीची मध्यम-अंतराची धावपटू आणि १५०० मीटर शर्यतीची राष्ट्रीय विक्रमधारक के. एम. दीक्षा

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धांच्या तयारीदरम्यान भारताची आघाडीची मध्यम-अंतराची धावपटू आणि १५०० मीटर शर्यतीची राष्ट्रीय विक्रमधारक के. एम. दीक्षा हिच्या नमुन्यात प्रतिबंधित पदार्थ आढळल्याची माहिती राष्ट्रीय उत्तेजक पदार्थ प्रतिबंधक संस्थेकडून (NADA) देण्यात आली आहे. या धक्कादायक घडामोडीमुळे आगामी राष्ट्रकुल स्पर्धांमधील तिच्या सहभागावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षाचा नमुना स्पर्धाबाह्य तपासणी मोहिमेदरम्यान घेण्यात आला होता. मे महिन्याच्या अखेरीस तिला यासंदर्भातील अधिकृत सूचना पाठवण्यात आली. या तपासणीत तिच्या नमुन्यात ‘स्टॅनोझोलॉल’ (Stanozolol) हा प्रतिबंधित पदार्थ आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा पदार्थ जागतिक उत्तेजक पदार्थविरोधी नियमांनुसार बंदी घालण्यात आलेल्या घटकांच्या यादीत समाविष्ट आहे.
सध्या तिच्यावर तात्पुरती निलंबनाची कारवाई झालेली नसली, तरी पुढील सुनावणी आणि तपास प्रक्रियेनंतर तिच्याविरोधात कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो. नियमांनुसार दोष सिद्ध झाल्यास तिला चार वर्षांपर्यंत स्पर्धांपासून दूर राहावे लागू शकते. त्यामुळे तिच्या क्रीडा कारकिर्दीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
के. एम. दीक्षा ही भारतीय धावपटूंमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखली जाते. गेल्या वर्षी अमेरिकेतील एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने १५०० मीटर शर्यत ४ मिनिटे ४.७८ सेकंदांत पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला होता. यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम हरमिलन बेन्स हिच्या नावावर होता. दीक्षाच्या या कामगिरीमुळे भारतीय ॲथलेटिक्स क्षेत्रात नव्या आशा निर्माण झाल्या होत्या.

COMMENTS