मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अंतर्गत सत्तासंघर्ष उफाळून आला असून, पक्षातील शीतयुद्ध आता उघडपणे समोर येऊ लागले आहे. नेतृत्वाच्या प्रश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अंतर्गत सत्तासंघर्ष उफाळून आला असून, पक्षातील शीतयुद्ध आता उघडपणे समोर येऊ लागले आहे. नेतृत्वाच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे पक्षातील गटबाजी अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. विशेषतः ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यातील वाढता तणाव राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
अजित पवार यांच्या पश्चात पक्षाची दिशा ठरवताना अनेक मुद्द्यांवर मतभेद उघड झाले. सुनेत्रा पवार यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर या वादाला अधिकच धार मिळाली. जानेवारीच्या उत्तरार्धापासून ते मार्चच्या सुरुवातीपर्यंत झालेल्या पत्रव्यवहाराला ग्राह्य धरू नये, असे पत्र त्यांच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आल्याने पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजी पसरली. या निर्णयामुळे नेतृत्वाविषयी संशय आणि असंतोष वाढल्याचे दिसून आले. याच काळात दिल्लीतील घडामोडींनीही तणाव वाढवला. सुनेत्रा पवार राजधानीत असताना प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही तेथे उपस्थित होते; मात्र त्यांनी त्यांच्याशी अंतर ठेवले, अशी चर्चा रंगली. या घटनांमुळे पक्षातील वरिष्ठ नेते आणि पवार कुटुंबीय यांच्यातील दरी अधिकच वाढल्याचे स्पष्ट झाले. पार्थ पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे कौतुक करणारे निवेदन प्रसिद्ध केले. मात्र, या कौतुकामागील उद्देशाबाबत वेगवेगळ्या तर्कांना उधाण आले आहे. एका बाजूला कौतुकाची भूमिका आणि दुसर्या बाजूला वाढत चाललेला संघर्ष यामुळे पक्षातील वातावरण अधिकच संभ्रमित झाले आहे. नेतृत्वाबाबत काही प्रस्ताव पुढे आल्याने पक्षात आणखी अस्वस्थता निर्माण झाली. त्यातच पार्थ पवार यांचा वाढता प्रभाव काही ज्येष्ठ नेत्यांना रुचत नसल्याचे संकेत मिळत आहेत. निर्णय प्रक्रियेत त्यांचा वाढता सहभाग आणि प्रभावामुळे पारंपरिक नेतृत्वात अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे दिसते. विधान परिषद निवडणुकीदरम्यान उमेदवार निवडीवरूनही मतभेद उघड झाले. एका उद्योगपतीच्या मुलाचे नाव पुढे करण्याच्या प्रस्तावाला वरिष्ठांकडून विरोध झाला आणि अखेरीस दुसर्या उमेदवाराची निवड करण्यात आली, ज्यामुळे अंतर्गत नाराजीची झलक दिसून आली.

COMMENTS