केज नगरपंचायत हद्दीतील गेल्या 20 ते 25 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणधारकांच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळण्याची चिन्हे दिसू लागली असून लाभ

केज नगरपंचायत हद्दीतील गेल्या 20 ते 25 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणधारकांच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळण्याची चिन्हे दिसू लागली असून लाभार्थ्यांना एका महिन्याच्या आत पीटीआर (प्रॉपर्टी ट्रान्सफर रेकॉर्ड) वाटप करण्यात येणार असल्याची माहिती गटनेते हारुणभाई इनामदार यांनी दिली.
केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने शहरातील क्रांतीनगर, रमाई नगर आणि वडार वस्ती परिसरातील अतिक्रमणधारकांना 500 चौरस फुटांपर्यंत जागा नियमित करून दिलासा देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात बोलताना हारुणभाई इनामदार म्हणाले की, क्रांतीनगर, रमाई नगर आणि वडार वस्ती भागात अनेक गोरगरीब नागरिक गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शासनाच्या जागेवर वास्तव्यास आहेत. मात्र त्यांच्या घरकुल व जागेचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. आता शासनाने हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी केज नगरपंचायतीमार्फत सुरू आहे. ते पुढे म्हणाले की, लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून एका महिन्याच्या आत पीटीआर वाटप केले जाईल. तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे. इनामदार यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त करत सांगितले की, अनेक वर्षे घरकुलांपासून वंचित राहिलेल्या गरीब नागरिकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे. निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि पुढेही जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संबंधित भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत गटनेते हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड, नगरसेवक तसेच नगरपंचायत प्रशासनाचे आभार मानले.

COMMENTS