Homeबीड

कुख्यात गुंड शेख कलीमची हर्सल कारागृहात रवानगी; एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई

बीड : जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुंडगिरी, अवैध धंदे आणि वाळू माफियांच्या विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रांजण ठेवले पण पाणीच नाही !पुष्पहार घालून, श्रीफळ फोडून गांधीगिरीतून प्रशासनाचा निषेध-डॉ.गणेश ढवळे
बीडमध्ये मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबवा, नागरी समस्या सोडवाभाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी
महिला कला महाविद्यालयात मा. अशोकरावजी पाटील (दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


बीड : जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुंडगिरी, अवैध धंदे आणि वाळू माफियांच्या विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत पेठ बीड परिसरातील कुख्यात गुंड शेख कलीम शेख जमाल (वय 41, रा. बारादरी मशीदजवळ, इस्लामपुरा, पेठ बीड) याच्यावर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटीज (एमपीडीए) कायद्यांतर्गत कारवाई करून त्याची छत्रपती संभाजीनगर येथील हर्सल मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे.शेख कलीम हा पेठ बीड परिसरातील अत्यंत धोकादायक आणि सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर, बीड शहर आणि पेठ बीड पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शासकीय कर्मचार्‍यांवर जीवघेणे हल्ले करणे, त्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, नागरिकांना रस्त्यात अडवून दारूसाठी पैशांची मागणी करणे, मारहाण करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून जबरी चोरीचा प्रयत्न करणे अशा विविध गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. यापूर्वीही त्याच्यावर बीएनएसएस 2023 च्या कलम 129 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्याच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा न झाल्याने आणि त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे सामान्य नागरिक तसेच शासकीय कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपीच्या वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करून पेठ बीड पोलीस ठाण्याने पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी 22 मे 2026 रोजी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन हर्सल मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले. दरम्यान, आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याने पेठ बीड पोलिसांनी माननीय न्यायालयाची आवश्यक परवानगी प्राप्त केली. त्यानंतर दिनांक 13 जून 2026 रोजी दुपारी 12.32 वाजता आरोपीला कायदेशीररीत्या ताब्यात घेऊन कडक पोलीस बंदोबस्तात छत्रपती संभाजीनगर येथील हर्सल मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू औताडे, पेठ बीड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश केळे, पोलीस उपनिरीक्षक मन्सूर शहा, पोलीस हवालदार सुभाष मोठे, नितीन राठोड, नितेश माने तसेच पोलीस अंमलदार गिरी यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी यावेळी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, जिल्ह्यातील वाळूचा बेकायदेशीर व्यापार करणारे, अवैध गुटखा विक्रेते, जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे, खंडणीखोर गुंड तसेच समाजात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकांविरुद्ध भविष्यातही एमपीडीए कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS