बीड : वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी प्रभारी पोलीस अधिक्षक चेतना तिडके मॅडम आणि अप्

बीड : वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी प्रभारी पोलीस अधिक्षक चेतना तिडके मॅडम आणि अप्पर पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.1 जून 2026 सोमवार रोजी सकाळी 10 ते 12 वाजण्याच्या दरम्यान जिल्हा कारागृहासमोर जिल्हा वाहतूक पोलिसांनी जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील आणि जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांच्या नेतृत्वाखाली एक अनोखी मोहीम राबविली. वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
या मोहिमेदरम्यान चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, कागदपत्रे जवळ नसणे, इन्शुरन्स नसणे, पीयुसी नसणे, लायसन्स नसणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांना थांबवून त्यांना गुलाबाचे फूल देण्यात आले. त्यानंतर संबंधित वाहनचालकांना नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी स्वतःहून नियमांचे पालन करून सुरक्षित वाहतुकीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.अपघात टाळण्यासाठी आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे किती आवश्यक आहे, याबाबत जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेक वाहनचालकांनी पोलिसांच्या या सकारात्मक उपक्रमाचे स्वागत केले. दंडाच्या भीतीपेक्षा जनजागृती आणि समुपदेशनातून नागरिकांमध्ये अधिक चांगला संदेश पोहोचतो, असे कारवाई दरम्यान जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांनी म्हटले आहे. या कारवाई दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये जिल्हा कारागृहासमोर नगर नाक्यावरुन विरुध्द दिशेने येणार्या 26 वाहन धारकांवर मोटार वाहन कायद्यान्वये केसेस करुन 17 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला व सायंकाळी नगर नाका येथे जिल्हा वाहतुक शाखा व शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने बालाजी स्वीट होमसमोर नगर नाक्यावरुन विरुध्द दिशेने येणार्या 30 वाहनांवर केसस करुन 22 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या कारवाईसाठी पोलीस हवालदार सखाराम घोलप, ज्ञानेश्वर जाधव, सुनिल जाधव, कुडके, पोलिस अंमलदार मोरे, शिवाजी नगर पो.स्टे.चे ग्रेड पीएसआय मच्छिंद्र राख, पोलीस अंमलदार विजय बोडखे, श्रीराम मुंडे, जिल्हा वाहतुक शाखेचे चालक कदम व वाघमारे यांनी सहभाग नोंदवून कर्तव्य बजावले. वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी बीड पोलिसांकडून वेळोवेळी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, नागरिकांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखा बीड यांनी केले आहे.

COMMENTS