Homeताज्या बातम्या

अखेर कामखेडा-कांबी शिवरस्ता खुला; 25 वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गीजिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; शेतकर्‍यांसह ग्रामस्थांमध्ये समाधान

बीड तालुक्यातील कामखेडा-कांबी या दोन गावांना जोडणारा तब्बल 25 वर्षांहून अधिक काळ विविध कारणांमुळे बंद असलेला शिवरस्ता अखेर महसूल प्रशासनाच्या प्र

कवडगाव येथे वैराग्य महामेरू श्री संत गोरोबाकाका यांची पुण्यतिथी भक्तिभावात साजरी
कौडगावातील अनाधिकृत खनन तातडीने बंद कराग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
तलवाडा येथे अधिकमासानिमित्त श्री महारूद्र हनुमान कथेचा प्रारंभ



बीड तालुक्यातील कामखेडा-कांबी या दोन गावांना जोडणारा तब्बल 25 वर्षांहून अधिक काळ विविध कारणांमुळे बंद असलेला शिवरस्ता अखेर महसूल प्रशासनाच्या प्रयत्नांतून सर्वांसाठी खुला करण्यात आला. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या निर्देशानुसार शेतकरी हिताला प्राधान्य देत महसूल विभागाने हा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याने दोन्ही गावांतील शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
हा रस्ता न्यायालयीन प्रक्रिया, स्थानिक वाद आणि काही जमीनधारकांच्या आक्षेपांमुळे अनेक वर्षे बंद होता. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षाखाली महसूल प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा करून संबंधितांना विश्वासात घेत कायदेशीर प्रक्रियेनुसार हा प्रश्न निकाली काढला. या संपूर्ण प्रक्रियेत अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या समन्वयातून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी स्वतः अनेक वेळा घटनास्थळी भेटी देत संबंधित जमीनधारक, शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. महसूल अभिलेख, गावनकाशे, जुने दस्तऐवज आणि न्यायालयीन बाबींचा सखोल अभ्यास करून सर्वांना विश्वासात घेतल्याने अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला. तहसीलदार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अंगद काशीद आणि ग्राम महसूल अधिकारी गणेश गायकवाड यांनी दिवसभर घटनास्थळी उपस्थित राहून रस्त्याची पाहणी, मोजणी, सीमांकन आणि रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही पूर्ण केली. त्यांनी महसूल अभिलेखांच्या आधारे हद्दी निश्चित करून संबंधितांना कायदेशीर स्थिती समजावून सांगत कोणताही वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली. कामखेडा-कांबी हा रस्ता दोन्ही गावांतील शेतकर्‍यांसाठी जीवनवाहिनी मानला जात होता. शेतीमालाची वाहतूक, कृषी अवजारांची ने-आण, विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांची वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार या मार्गावर अवलंबून होते. रस्ता बंद असल्याने नागरिकांना अनेक किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात शाळकरी मुले, गर्भवती महिला आणि गंभीर रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. कामखेडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, शासकीय कार्यालये, बँका, शैक्षणिक संस्था आणि बाजारपेठ असल्याने कांबीसह परिसरातील नागरिकांचा या गावाशी सातत्याने संपर्क असतो. रस्ता बंद असल्यामुळे शेतीमाल वेळेत बाजारात पोहोचत नव्हता तसेच आरोग्य आणि शिक्षण सेवांवरही परिणाम होत होता. रस्ता खुला झाल्यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा पुष्पहार, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रशासनाने लोकहिताला प्राधान्य देत संवेदनशीलतेने काम केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपसरपंच तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. रस्ता सुरू झाल्यामुळे आता शेतकर्‍यांना ट्रॅक्टर, हार्वेस्टर, कृषी अवजारे, बियाणे, खते आणि शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला असून नागरिकांना आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, बाजारपेठ आणि शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकाही वेळेत पोहोचू शकणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महसूल प्रशासनाने सांगितले की, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रलंबित शेतरस्त्यांचे प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याची मोहीम सुरू असून लोकसहभाग, पारदर्शकता आणि कायद्याचे काटेकोर पालन यांच्या माध्यमातून शेतकरी हिताचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जात आहेत.

COMMENTS