माजलगाव : माजलगाव पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या १५ व्या वित्त आयोगाच्या विकासकामांमध्ये, विविध घरकुल योजनांमध्ये तसेच ग्रामपंचायत स्तर

माजलगाव : माजलगाव पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या १५ व्या वित्त आयोगाच्या विकासकामांमध्ये, विविध घरकुल योजनांमध्ये तसेच ग्रामपंचायत स्तरावरील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख विजयदादा साळवे यांनी केला आहे. यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देत संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये १५ व्या वित्त आयोगातील विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार, निधीचा अपव्यय, बनावट बिले, नियमबाह्य मंजुरी आणि कंत्राटी प्रक्रियेत अनियमितता झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शासनाच्या निधीची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आदी घरकुल योजनांमध्ये पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना लाभ देण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. अनेक गरीब व गरजू नागरिकांना घरकुल मिळाले नसताना काहींना नियमबाह्य पद्धतीने लाभ देण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, यामागे काही अधिकारी, कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक आणि राजकीय दलालांचे संगनमत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय घळाटवाडी ग्रामपंचायत निवडणुकीतील नामनिर्देशन प्रक्रियेत चुकीची माहिती सादर करण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणातील संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. रिपब्लिकन सेनेने या सर्व प्रकरणांची स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून सखोल तपास करावा, दोषींना निलंबित करून फौजदारी कारवाई करावी आणि पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून माजलगाव पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे पंडित ओव्हाळ, सुरेश साळवे, वशिष्ठ लांडगे, वैजनाथ गडसिंग, सय्यद अन्वर, धम्मानंद गावडे, गंगाधर सोनपसारे, विशाल ससाने, भास्कर पौळ, मोकिंदा खरात, संतोष खुणे, विश्वनाथ तोडके, धम्मानंद पोटभरे, विलास खळगे, केशव चोपडे, राजरत्न भालेराव, राजू किर्ते, निवृत्ती गायकवाड, सचिन सोनकांबळे, सुरेश काळे, गौतम सोनपसारे, आनंद शिंदे, अजय साळवे, विशाल पायके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS