बीड : पाठ्यपुस्तकात ज्यांच्या साहित्याचा अभ्यास केला जातो, तेच कवी आणि लेखक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या भेटीला आल्याने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक

बीड : पाठ्यपुस्तकात ज्यांच्या साहित्याचा अभ्यास केला जातो, तेच कवी आणि लेखक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या भेटीला आल्याने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला आणि लेखनकौशल्याला नवी दिशा मिळेल. या नावीन्यपूर्ण उपक्रमातून भविष्यात अनेक नवे कवी आणि लेखक घडतील, मराठी भाषा अधिक समृद्ध होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी विषयाची गोडी वाढून परीक्षेतील निकालाचा टक्काही निश्चितच उंचावेल, असा विश्वास मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम (बप्पा) काळे यांनी व्यक्त केला.
लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच आमदार विक्रम काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने मराठवाड्यातील ४० शाळांमध्ये बालभारतीच्या ‘पाठ्यपुस्तकातील प्रत्यक्ष कवी/लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता द. बा. घुमरे विद्यालय, बीड येथे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते उत्साहात झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर लाडके शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शिक्षणामुळेच माणसाचा विकास होतो, प्रगती होते आणि शिक्षण माणसाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देते असे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दहावीच्या परीक्षेत राज्यातील ९४ हजार ४०० विद्यार्थी मराठी विषयात नापास झाल्याबद्दल चिंता व्यक्त करत, मराठी विषयात एकही विद्यार्थी नापास होऊ नये यासाठी मराठी भाषेला इंग्रजी आणि गणिताइतकेच महत्त्व दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
उद्घाटनानंतर इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील ‘कौतुकाची थाप’ या पाठाचे लेखक अय्युब पठाण लोहगावकर यांनी द. बा. घुमरे पब्लिक स्कूल, यशवंत विद्यालय, शिवाजी विद्यालय, आदर्श विद्यालय, छत्रपती राजर्षी शाहू विद्यालय आणि इंदिरा विद्यालय या सहा शाळांना प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी लेखकांना त्यांच्या लेखनप्रवासापासून ते पाठाच्या निर्मितीपर्यंत विविध प्रश्न विचारले, ज्यांची उत्तरे लेखकांनी दिलखुलासपणे दिली. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पाच शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांतील २८ शाळांमध्ये उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. आता लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत हा उपक्रम सुरू होत आहे. या उपक्रमात प्रा. रामदास केदार, कवी सुरेश सावंत आणि लेखक अय्युब पठाण लोहगावकर हे संवाद साधत आहेत.
दुपारी ४ वाजता स्काऊट भवन, बीड येथे आमदार विक्रम काळे यांच्या पुढाकाराने ‘शिक्षक दरबार’ पार पडला. शिक्षकांनी विनाअनुदानित शाळांना अनुदान, १ एप्रिल २०२७ पासून पुढील वाढीव अनुदानाचा टप्पा, जुनी पेन्शन योजना, आणि अशैक्षणिक कामांचा बोजा यांसारख्या विविध प्रलंबित प्रश्नांचा पाढा मांडला. शिक्षकांच्या प्रश्नांवर शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार काळे यांनी दिले. यावेळी जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील, उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे, वेतन अधीक्षक राजेश खटावकर यांच्यासह शेकडो शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS