परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धर्मापुरी येथे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) केलेल्या धडक कारवाईत गांजा विक्रीच्या मोठ्या अड्ड्याचा पर्दा

परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धर्मापुरी येथे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) केलेल्या धडक कारवाईत गांजा विक्रीच्या मोठ्या अड्ड्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत 20 किलो 340 ग्रॅम गांजा, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि इतर साहित्य असा एकूण 9 लाख 77 हजार 320 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी)गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की धर्मापुरी येथील बाबूलाल उर्फ बबलू आतार हा आपल्या राहत्या घरातून गांजाची बेकायदेशीर विक्री करत आहे. ही माहिती अत्यंत खात्रीशीर असल्याने पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकार्यांना याबाबत अवगत करून कारवाईची परवानगी घेतली. त्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज जारवाल यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकासोबत महसूल विभागातील अधिकारी, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनाही समाविष्ट करण्यात आले, जेणेकरून कारवाई कायदेशीर प्रक्रियेत पारदर्शकपणे पार पडेल. पथकाने धर्मापुरीतील संबंधित घरावर अचानक छापा टाकला. घराची कसून झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गांजा साठा आढळून आला. तसेच गांजाचे वजन मोजण्यासाठी वापरण्यात येणारा इलेक्ट्रॉनिक काटा देखील जप्त करण्यात आला. जप्त केलेला गांजा विक्रीसाठी तयार अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, हा साठा स्थानिक पातळीवर वितरित केला जात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी सपोनि धनराज जारवाल यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 274/2026 नुसार एनडीपीएस (एनडीपीएस) कायदा कलम 20 आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 20 : गांजाचे उत्पादन, विक्री किंवा वाहतूक कलम 29 : गुन्ह्यात सहभाग/षड्यंत्र या दोन्ही कलमानुसार आरोपींवर गंभीर स्वरूपाची कारवाई होऊ शकते. या प्रकरणात शेख बाबूलाल आतार आणि वसीम बाबूलाल आतार (दोघे रा. धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू असून या नेटवर्कमध्ये आणखी कोण सहभागी आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे (अंबाजोगाई उपविभाग) आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज जारवाल, पोलीस अंमलदार दिलीप गिते, भागवत शेलार, दीपक खांडेकर, महिला पोलीस अंमलदार स्वाती मुंडे, चालक हराळे तसेच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जप्त केलेला गांजा कुठून आणला गेला, त्याचे वितरण कोणत्या भागात होत होते आणि यामागे मोठे रॅकेट आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई परिसरात मोठी चर्चा निर्माण करणारी ठरली आहे.

COMMENTS