Homeताज्या बातम्या

श्री क्षेत्र चाकरवाडीचा रस्ता 22 महिन्यांपासून रखडला; ग्रामस्थांचा संताप

बीड : श्री क्षेत्र चाकरवाडीकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने भाविक, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले

मराठवाडा चेंबरच्या महासचिवपदी संदीप लाहोटी यांची बिनविरोध निवड
सौ. के. एस. के. महाविद्यालयात स्व.अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी
उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा ‘पर्यावरण वारी’ उपक्रम यशस्वी; ५ लाख कापडी पिशव्या व स्टील बाटल्यांचे वाटप

बीड : श्री क्षेत्र चाकरवाडीकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने भाविक, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होऊन तब्बल 22 महिने उलटले असतानाही प्रत्यक्षात कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. उद्घाटनानंतर एक मुरमाची पाटी किंवा एक दगडही या रस्त्यावर टाकण्यात आलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पावसाळा सुरू होताच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात. त्यामुळे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे? असा प्रश्न निर्माण होतो. चिखल, पाणी आणि खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, पायी जाणार्‍या नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. श्री क्षेत्र चाकरवाडी हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने दररोज तसेच विशेषतः सण-उत्सवाच्या काळात हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र खराब रस्त्यामुळे भाविकांचा प्रवास अत्यंत कष्टदायक ठरत आहे. अनेकदा दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र उद्घाटनानंतर तब्बल 22 महिने उलटूनही प्रत्यक्ष कामाचा मागमूसही दिसत नाही. त्यामुळे उद्घाटन केवळ राजकीय दिखावा होता का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. ग्रामस्थांचा आरोप आहे की, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेची मने जिंकण्यासाठी घाईघाईत उद्घाटन करण्यात आले. जर प्रत्यक्षात काम सुरू करण्याचा कोणताही हेतू नव्हता, तर उद्घाटनाचा सोहळा कशासाठी करण्यात आला? असा संतप्त प्रश्न आता चाकरवाडीकर विचारत आहेत.पावसाळ्यात शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना या रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चिखलातून वाट काढत प्रवास करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. श्री क्षेत्र चाकरवाडीसारख्या धार्मिक स्थळाकडे जाणारा रस्ता इतक्या वर्षांपासून दुर्लक्षित राहणे ही दुर्दैवी बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

COMMENTS