धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीवरील वादग्रस्त बाभळी बंधार्यातील 0.2 टीएमसी (सुमारे 5.5 दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसा

धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीवरील वादग्रस्त बाभळी बंधार्यातील 0.2 टीएमसी (सुमारे 5.5 दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी (दि. 1 जुलै) त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत तेलंगणातील श्रीरामसागर (पोचमपाड) प्रकल्पाकडे सोडण्यात आला. यासाठी बंधार्याचे सर्व 14 दरवाजे वर उचलण्यात आले असून, त्यामुळे बाभळी बंधारा पूर्णपणे रिकामा झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दरवर्षी 29 ऑक्टोबरपासून बाभळी बंधार्यात पाणी साठविले जाते, तर 1 जुलै रोजी बंधार्याचे 14 दरवाजे उचलून साठविलेले पाणी तेलंगणातील श्रीरामसागर प्रकल्पाकडे सोडले जाते. ही प्रक्रिया केंद्रीय जल आयोग, महाराष्ट्र शासन आणि तेलंगणा शासनाच्या प्रतिनिधींच्या संयुक्त उपस्थितीत पार पडते. यंदा 30 जूनपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्याने परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती, जनावरे, वन्यजीव आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच बंधार्यातील उपलब्ध पाणी सोडण्यात आल्याने धर्माबादसह परिसरातील पाच तालुक्यांतील शेतकर्यांनी चिंता व्यक्त केली. बुधवारी सकाळी 6 वाजता बाभळी बंधार्यातील पाण्याची पातळी 330.42 मीटर इतकी होती. बंधार्यात एकूण 0.2 टीएमसी म्हणजेच सुमारे 5.5 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होता. या प्रक्रियेसाठी केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता एन. चरण व कनिष्ठ अभियंता ए. एस. प्रणित, तेलंगणातील श्रीरामसागर (पोचमपाड) प्रकल्पाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता रवी कोठा तसेच महाराष्ट्राचे प्रतिनिधी व कार्यकारी अभियंता सी. आर. बनसोड यांचा त्रिस्तरीय समितीत समावेश होता. यावेळी बाभळी पाटबंधारे उपविभाग, उमरीचे उपविभागीय अधिकारी सी. डी. पोतदार, शाखा अभियंते डी. एस. गव्हाणे, ऋषिकेश खिंडरे, एस. जी. मुसळे तसेच तानाजी बन्सी जाधव उपस्थित होते. बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोशनगावकर आणि सहसचिव जी. पी. मिसाळे यांनी यावेळी त्रिस्तरीय समितीशी विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धर्माबाद पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सोमनाथ मठपती, सुनील पत्रे, पोलीस कॉन्स्टेबल अरुण कदम, रावण बारोळे आदींनी बाभळी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.

COMMENTS