छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी घडलेल्या एका घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे. आप

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी घडलेल्या एका घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे. आपल्या भेटीसाठी येणार्या नागरिकांशी पोलिसांकडून अयोग्य आणि उद्धट वर्तन केले जात असल्याचा आरोप करत दिपके यांनी एका पोलीस उपनिरीक्षकाला थेट जाब विचारला. या प्रसंगाचा चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रफितीत अभिजित दिपके पोलीस अधिकार्याशी स्पष्ट शब्दांत संवाद साधताना दिसतात. मला कोणाला भेटायचे आणि कोणाला नाही, हा निर्णय मी स्वतः घेणार आहे. तो निर्णय पोलीस किंवा इतर कोणतीही यंत्रणा घेऊ शकत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितल्याचे दिसून येते. तसेच आपल्या निवासस्थानी येणार्या सामान्य नागरिकांना अडविणे किंवा त्यांच्याशी गैरवर्तन करणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
दिपके यांनी पोलिसांच्या कथित दडपशाहीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांना विनाकारण अडविणे किंवा त्यांची चौकशी करून त्यांना त्रास देणे ही लोकशाहीच्या मूल्यांना धरून नसल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेदरम्यान संबंधित पोलीस अधिकार्याला त्यांनी निवासस्थानाबाहेर जाण्यास सांगितल्याचेही चित्रफितीत दिसून येत आहे. या घटनेनंतर अभिजित दिपके यांनी समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे काही संदेश प्रसिद्ध करत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला. आपल्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. तसेच परदेशातील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विकसित करणार्या कंपन्यांच्या माध्यमातून नागरिकांवर लक्ष ठेवले जात आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र, दिपके यांनी केलेल्या या आरोपांबाबत कोणताही अधिकृत पुरावा सार्वजनिक केलेला नाही. तसेच केंद्र सरकार किंवा संबंधित यंत्रणांकडून या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दिपके आणि पोलीस अधिकार्यामधील संवादाची चित्रफीत समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत असून त्यावर समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी नागरिकांना भेटण्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला आहे, तर काहींनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या भूमिकेचाही विचार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

COMMENTS