Homeताज्या बातम्या

देशाला नव्या पक्षापेक्षा व्यापक जनांदोलनाची गरज: अभिजित दिपके

छत्रपती संभाजीनगर: नीट परीक्षा गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन उभारल्यानांतर चर्चेत आलेल्या 'कॉकरोच जनता पक्ष'च्या मुख

मेंढपाळांसाठी चराई क्षेत्र अन् गुन्हे मागे घेण्याबाबत धोरण ठरणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
व्यवस्थापन कोट्याच्या नावाखाली कोट्यवधींचा खेळ? उच्च शिक्षण विभागाचा दणका; शिक्षण सम्राटांच्या अडचणी वाढल्या
इराण-अमेरिका तणावामुळे भारतावर महागाईचे सावट; होर्मुज खाडीनंतर दुसरा सागरी मार्गही ठप्प, तेल पुरवठा विस्कळीत

छत्रपती संभाजीनगर: नीट परीक्षा गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन उभारल्यानांतर चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पक्ष’च्या मुख्य समितीची दोन दिवसीय बैठक बुधवारपासून छत्रपती संभाजीनगर येथे सुरू झाली आहे. या बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना संस्थापक अभिजित दिपके यांनी सध्याच्या राजकीय घडामोडी, न्यायव्यवस्था, निवडणूक प्रक्रिया आणि विविध घटनात्मक संस्थांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, आपल्या संघटनेचे रूपांतर राजकीय पक्षांत केले जाणार नसून, जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावी दबावगट म्हणूनच पुढील वाटचाल केली जाईल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. दिपके यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीसाठी सौरव दास, यतीन गोयल, वैष्णवी गौर, रत्ना सिंग, अक्षय मराठे, अजिंक्य शिंदे, आशुतोष रांका यांच्यासह मुख्य समितीतील पदाधिकारी उपस्थित आहेत. आगामी आंदोलनांची दिशा, संघटन विस्तार आणि विविध लोकहिताच्या प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होत आहे. पत्रकार परिषदेत बोलताना अभिजित दिपके म्हणाले की, नीट परीक्षा आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नापुरता मर्यादित नव्हता. देशातील राजकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, शिक्षण व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याची भावना समाजात वाढत आहे. ही नाराजी देशभरातील विविध आंदोलनातून स्पष्टपणे दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या मते, लोकशाही संस्थांची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक सामाजिक चळवळीची गरज आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न संघटना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना दिपके यांनी पक्षांतराच्या राजकारणावर टीका केली. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काही वेळातच पक्ष बदलतात, त्यामुळे मतदारांचा विश्वास कमी होत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच विविध केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापराबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकता टिकविण्याची आवश्यकता व्यक्त केली. देशातील अनेक प्रश्नांमुळे विविध विचारांचे नागरिक एकत्र येत असून, ही नव्या सामाजिक चळवळीची सुरुवात असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. संघटना राजकीय पक्षात रूपांतरित होणार का, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर दिपके यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. देशाला आणखी एका राजकीय पक्षाची आवश्यकता नसून, लोकांच्या प्रश्नांवर सरकारवर प्रभावीपणे दबाव निर्माण करणाऱ्या संघटित जनांदोलनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही निवडणूक राजकारणात उतरण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारा दबावगट म्हणूनच काम करू, असे त्यांनी स्पष्ट केले. संघटन विस्तारासाठी आखला जाणार आराखडा दोन दिवसांच्या बैठकीत देशभरात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे. बेरोजगारी, आर्थिक अडचणी, इंधन धोरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर भविष्यात कोणती भूमिका घ्यायची, यावरही मुख्य समितीत चर्चा सुरू असल्याची माहिती दिपके यांनी दिली. संघटनेचे प्रवक्ते सौरव दास यांनी आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय तसेच कायदेशीर मदत दिली जात असल्याचे सांगितले.

COMMENTS