Homeताज्या बातम्या

घरकुल अनुदानावर डाका; १५-२० हजारांच्या लाचखोरीने किनवट पंचायत समिती पोखरली!

किनवट: गोरगरिबांना हक्काचे छत्र मिळावे म्हणून केंद्र व राज्य सरकार पंतप्रधान घरकुल योजनेचा कितीही ढोल पिटत असले, तरी किनवट पंचायत समितीच्या ’परमप

पीएमएफएमई योजनेतून महिला बचत गटांना उद्योगाचे बळ; प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्रांचे वाटप: सभापती आरती बनसोडे
शनैश्वर देवस्थानच्या दानपात्रात ४९ लाखांचे दान; १७ ग्रॅम सोने, ४८२ ग्रॅम चांदीही अर्पण
राज्यात लवकरच ८८ नवीन महसूल कार्यालये प्रस्तावित; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, हरकती व सूचना मागविल्या

किनवट: गोरगरिबांना हक्काचे छत्र मिळावे म्हणून केंद्र व राज्य सरकार पंतप्रधान घरकुल योजनेचा कितीही ढोल पिटत असले, तरी किनवट पंचायत समितीच्या ’परमपवित्र’ कार्यालयात मात्र या योजनेचा थेट ’लिलाव’ मांडला गेल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. घरकुलाचा हप्ता बँकेत जमा करायचा असेल, तर १५ ते २० हजार रुपयांची ’भिजत घोंगडी’ सुटल्याशिवाय फाईल पुढे सरकतच नाही. या उघडउघड लाचखोरीमुळे गोरगरीब लाभार्थ्यांचे कंबरडे मोडले असून, या भ्रष्ट अभियंते आणि ऑपरेटर यांच्यावर कारवाई करा, अन्यथा पंचायत समितीला टाळे ठोकू, असा थेट इशारा शिवसेना तालुकाप्रमुख मारोती दिवसे पाटील यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

सरकारी कागदपत्रांवर योजना ’सर्वसामान्यांसाठी’ असली, तरी किनवट पंचायत समितीत मात्र ती कंत्राटी अभियंते आणि ऑपरेटर यांच्या ’समृद्धी’साठी राबवली जात आहे. पहिला १५ हजारांचा हप्ता खात्यात जमा करून लाभार्थ्यांना जाळ्यात ओढायचे आणि त्यानंतर मिळणार्‍या ७० हजारांच्या दुसर्‍या हप्त्यासाठी तसेच अंतिम बिलासाठी विविध त्रुटींचे ’घोडे’ पुढे करायचे, असा सोपा आणि फायदेशीर धंदा इथे सुरू आहे. ज्या गरिबांकडे लाचेचे १५-२० हजार रुपये देण्याची ऐपत नाही, ते गेल्या वर्षभरापासून पंचायत समितीचे उंबरठे झिजवून चपला झिजवत आहेत. तालुक्यातील जवळजवळ प्रत्येक गावात हीच परिस्थिती असून, ’कमिशन’ दिले तरच फाईलला मंजुरीचे पंख फुटतात, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी वातानुकूलित केबिनमध्ये बसून योजनेची टक्केवारी मोजत असताना, दुसरीकडे गोरगरिबांची मात्र उघड्यावर आर्थिक लूट सुरू आहे. मारोती दिवसे पाटील यांनी आपल्या निवेदनात प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले असून घरकुलाच्या नावावर गरिबांचे रक्त शोषण करणार्‍या दोषी अभियंत्यांवर आणि ऑपरेटरवर तातडीने निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे. रखडलेले हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास, शिवसेनेचा दणका काय असतो हे किनवट पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन करून दाखवून देऊ! असा सज्जड इशारा दिला आहे.

स्थानिक प्रशासनाच्या या ’आंधळ्या कारभाराची’ गंभीर दखल घेत, या निवेदनाच्या प्रती थेट विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादासजी दानवे यांच्यासह सर्व संबंधित वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मुख्य कार्यकारी अधिकारी या भ्रष्ट यंत्रणेवर कारवाईचा चाबूक चालवतात की नेहमीप्रमाणे ’चौकशीचे नाटक’ करून प्रकरण गुंडाळतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS