नांदेड : दैनिक नवराष्ट्रच्या नांदेड-परभणी-हिंगोली आवृत्तीचे संपादक सुनील जोशी यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघतर्फे ’उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्का

नांदेड : दैनिक नवराष्ट्रच्या नांदेड-परभणी-हिंगोली आवृत्तीचे संपादक सुनील जोशी यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघतर्फे ’उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या सन्मानाबद्दल नांदेड शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार बांधव तसेच वाचकवर्गातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
गेल्या तब्बल 31 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुनील जोशी यांनी आपल्या लेखणीच्या बळावर स्वतंत्र, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारितेची ओळख निर्माण केली आहे. जिल्हा प्रतिनिधी, वृत्तसंपादक, आवृत्ती संपादक अशा विविध जबाबदार्यांमध्ये त्यांनी यशस्वीपणे काम पाहिले आहे. पत्रकारितेतील दीर्घ अनुभवासोबतच राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय घडामोडींवरील त्यांचा सखोल अभ्यास विशेष मानला जातो. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई आणि जळगाव अशा विविध ठिकाणी त्यांनी कार्य करत पत्रकारितेचा व्यापक ठसा उमटविला आहे. सत्यशोधन पत्रकारिता, प्रभावी तपासात्मक वृत्तांकन, प्रशासनातील अनियमितता उघड करणारे लेखन तसेच क्राईम आणि क्रीडा क्षेत्रातील वस्तुनिष्ठ मांडणी ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यांच्या अनेक बातम्यांमुळे प्रशासनाला कारवाई करावी लागली असून जनहिताचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. यापूर्वीही त्यांना पा.वा. गाडगीळ पुरस्कार तसेच सुधाकरराव डोईफोडे पत्रभूषण पुरस्कार यांसारख्या सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. नांदेड येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित श्री परशुराम तेजोत्सव कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS